संग्रहित छायाचित्र
वाहतूक नियोजनाचा बोजवारा, बेशिस्त वाहनचालक, नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने, अरुंद होत चाललेले रस्ते, अतिक्रमणे, व्यापारी आणि मॉल संस्कृतीमुळे भर रस्त्यावर होत असलेले पार्किंग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे दिवाळीच्या तोंडावर शहरातील बाजारपेठांबरोबरच मुख्य रस्तेदेखील तुंबू लागले आहेत. आजवर कधीही वाहतूक कोंडी न होणारे मोरवाडी, कोकणे चौक, चिंचवड स्टेशन, भोसरी आळंदी रोड, तळवडे ही ठिकाणे आता वाहतूक कोंडीची स्पॉट होऊ लागली आहेत. परिणामी, शहरातील नागरिकांना घरातून बाहेर पडताना मोटर न्यावी का, असा विचार करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते प्रशस्त आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे दापोडी ते निगडी हा ग्रेड सेपरेटर रस्ता. मात्र, अलीकडच्या काळामध्ये याच रस्त्यावरची वाहतूक कोंडी पोलिसांची डोकेदुखी होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर गेल्या काही दिवसांमध्ये व्यापाऱ्यांनी मोठी दालने खुली केली आहेत. याचा फटका थेट वाहतुकीला बसत आहे.
मोरवाडी चौकात एका मोठ्या कापड व्यावसायिकांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर उभारली जातात. या ठिकाणी होणारी गर्दी आणि त्यातच मेट्रो स्थानक असल्यामुळे मोरवाडी चौक मोठा वाहतूक कोंडी स्पॉट होऊ लागला आहे. चिंचवड स्टेशनपासून ते पिंपरीतील मुख्य चौकापर्यंत पोहोचण्यासाठी यापूर्वी अंदाजे १५ मिनिटे लागत होती. मात्र, आता या कृत्रिम वाहतूक कोंडीच्या कारणामुळे वाहने मोरवाडी चौकातच पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ अडकून पडावे लागते.
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठेमध्ये गर्दी असते. मात्र, शहरातील इतर भागातही पर्यायाने वाहतूक कोंडीत वाढ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही वाहतूक कोंडी होत नव्हती, त्या रस्त्याचा वापर वाहनचालक प्राधान्याने करत होते. मात्र असा रस्ता सध्या शोधणे अवघड झाले आहे. कारण, वाहतुकीचे ढिसाळ नियोजन आणि वाहनाचे बेसुमार पार्किंग होय. काळेवाडी चौकामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता वाढवण्यात आला. मात्र, उलटपक्षी उलट्या दिशेने येणारी वाहने आणि सिग्नलचे पालन होत नसल्याने या ठिकाणी वाहतुकीचे तीन तेरा वाजतात. तोच काळेवाडीपासून ते एम्पायर इस्टेट या बीआरटी रस्त्यालगतदेखील बेशिस्त वाहन पार्किंगचा फटका बसतो. या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात संख्या वाढत आहे.
एकेरी वाहतूक नावालाच
पिंपरी-चिंचवड विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी वाहतुकीची पद्धत अवलंबली आहे. त्यात पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल, चिंचवड स्टेशन येथील पोस्ट ऑफिस, भूमकर चौक ते विनोदी वस्ती, पिंपरी बाजारपेठ अशा ठिकाणी शिस्त पालन होणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी एकाही रस्त्यावर त्याचे पालन होताना दिसत नाही. परिणामी वाहतूक कोंडीत भर पडते.
ही आहेत वाहतूक कोंडीची मुख्य कारणे
रस्त्यावर कापड व्यावसायिक आणि मॉलचालकांकडून होत असलेली कृत्रिम वाहतूक कोंडी, अतिक्रमणाने वेढलेले रस्ते, रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विक्रेते, दुहेरी पार्किंग, सिग्नलचे पालन न करता दामटलेली वाहने, रस्त्यावरच उभी करण्यात येणाऱ्या मोटारी, दुकानासमोर पदपथावर मांडण्यात येणारे साहित्य, विनापरवाना थांबण्यात येणारे ट्रॅव्हल्स, खासगी प्रवासी वाहतूक अशा अनेक कारणांनी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
रस्ते छोटे, पदपथ मोठे
शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी पुणे मुंबई महामार्ग, टेल्को रस्ता ते बालाजीनगर, भूमकर चौक ते शिवार चौक, पवना नदी पूल ते डांगे चौक येथे सुमारे २०० कोटीहून अधिक खर्च होत आहे. परिणामी, रस्ते छोटे होत असून पदपथ वाढत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि याला होत नसलेला विरोध हे पाहता येत्या काही दिवसात शहरांमध्ये सर्रासपणे हे चित्र दिसून येईल. परिणामी, पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी एक मोठी डोकेदुखी होऊन बसणार आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी त्या त्या विभागातील निरीक्षकांना सूचना दिलेल्या आहेत. कोंडी होत असलेल्या ठिकाणी वाहतूक पोलीस नेमण्यात आलेले आहेत. त्याचा आढावा घेण्यात येईल.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त (वाहतूक)
कोकणे चौक, फिनोलेक्स चौकामध्ये भर रस्त्यात पार्किंग
घरातून बाहेर पडताना नागरिकांना वाहन कोठे पार्क करावे, याचे तारतम्य नसते. परिणामी रस्त्याच्या कडेला होत असलेले पार्किंग आता थेट रस्त्यावर होऊ लागले आहे. कोकणे चौकापासून ते काळेवाडी फाटा रस्त्यावर असलेल्या रस्त्यावरतीच वाहने पार्क केली जातात. भोसरी रस्त्यावरील फिनोलेक्स चौकात उड्डाण पुलाखाली असलेल्या रस्त्यावर बस, प्रवासी वाहनांचे हक्काचे पार्किंग झाले आहे. वाकड, थेरगाव या ठिकाणी नुकत्याच सुरू झालेल्या एका मोठ्या मॉलसमोर दोन्ही बाजूला पार्किंग करण्यात येते. अशा ठिकाणी एकही वाहतूक पोलीस नसतो. तसेच कारवाई होत नसल्याने वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.