भोसरीचा पाणीप्रश्न पेटणार; पाण्यासाठी सोसायट्यांना दुहेरी भुर्दंड
भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा राजकीय आराखडा तापला असतानाच पाणीप्रश्नदेखील कळीचा मुद्दा ठरणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, भोसरी विधानसभेतील अनेक गावात कृत्रिम पाणीटंचाईमुळे टॅंकर लाॅबीची चांदी सुरू आहे.
भोसरी, चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी यासह अनेक भागात दर महिना पाण्यासाठी सोसायटीतील रहिवाशांना लाखो रुपये खर्च करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेला पाण्याचा टॅक्स भरूनदेखील शंभराहून अधिक सदनिका असलेल्या सोसायटीला दहा ते बारा लाख रुपये पाण्यावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पाणीप्रश्न पेटणार असून सोसायट्यांतील रहिवाशांचे मतदान निर्णायक ठरले तर परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपच्या काळापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.पवना धरणासह आंद्रा धरण शंभर टक्के भरल्यानंतरदेखील महापालिका प्रशासकीय राजवटीत दिवसाआड पाणीपुरवठा सुरूच ठेवला. उन्हाळा असो की हिवाळा, आतादेखील शेकडो सोसायटीला टॅंकरने पाणी घ्यावे लागत आहे. पावसाळ्यात टॅंकरची मागणी कमी असते. पण उन्हाळ्यात टॅंकरची मागणी वाढते. भोसरी, चिखली, मोशी, चऱ्होली, पिंपरीसह वाकड, किवळे, सांगवी, पिंपळे सौदागर यासह अनेक भागात दररोज टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना, आंद्रा धरण दरवर्षी शंभर टक्के भरतात. सत्ताधारी भाजपच्या काळात आणि महापालिकेने पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या पाईपलाईनमधून सुमारे ३८ टक्के पाणीगळती होत असल्याचे सांगितले जाते. पण, पाणीगळती रोखण्यास उपाययोजना जात नाहीत. त्यामुळे भोसरीतील अनेक भागात अजूनही पाणीपुरवठा कमी दाबाने आणि पुरेसा होत नाही. सोसायटी असो किंवा बैठक घरात दूषित, अस्वच्छ पाणीपुरवठा होतोय. तर काही तांत्रिक कारणाने वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास खासगी टॅंकर लाॅबीची चांदी होत आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्यासह वापरायच्या पाण्याचादेखील टॅंकरद्वारे पुरवठा केला जात आहे.
भामा-आसखेडच्या पाण्याची प्रतीक्षाच भोसरीसह समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी घेतले जाणार आहे. प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्यासाठी धरणापासून चिखलीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. मात्र, गेल्या चार वर्षांपासून पाईपलाईनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पाईपलाईनचे १८ किलोमीटर ऐवजी केवळ ८ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. जून २०२५ अखेर मुदतीत हे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे चिखलीसह तळवडे, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, बोपखेल, भोसरीचा काही भाग, मोशी प्राधिकरण आदी भागातील नागरिकांना पाण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आंद्रा धरणाचे पाणी पुरेना
आंद्रा धरणातून महापालिकेकडून शंभरऐवजी ७० एमएलडी पाणी उचलण्यात येते. ते पाणी महापालिकेच्या भोसरीसह चिखली, मोशी, चऱ्होली, डुडुळगांव या समाविष्ठ गावांतील अनेक भागात पुरवठा केला जातो. मात्र, ते पाणीदेखील कमी पडत असल्याने अनेक भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.
नव्या भागात पाणीच नाही
भोसरीतील अनेक नव्याने विकसित झालेल्या भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे. अनेक सोसायटी भागात महापालिकेचे पाणी नाही. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा न झाल्याने पिण्यासह वापरायचे पाणीदेखील टॅंकरने घेण्याची वेळ तेथील रहिवाशांवर आली आहे.
टँकरच्या खर्चाचा सोसायटीला भुर्दंड
भोसरी विधानसभेतील अनेक गावांचा पाणीपुरवठा सतत विस्कळीत होत असतो. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शेकडो सोसायट्यांना टॅंकरने पाणी घेण्याची वेळ येते. त्या टॅंकरच्या खर्चाचा भुर्दंड सोसायटीतील नागरिकांना सहन करावा लागला आहे.
अनेकदा अचानक पाईपलाईन लिकेज झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो, तर काही भागात कमी प्रमाणात होतो. नेहमीपेक्षा कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने ऐनवेळी सोसायट्यांना पाण्याची तारांबळ उडत असते. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टॅंकरद्वारे पाणी घेण्याची वेळ येत आहे. नागरिकांना विकेंडच्या दिवशी पाण्याचे टॅंकर मागवून त्या खर्चांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पाणीपुरवठा खंडित, सोसायटीचा खर्च वाढला
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून एक-दोन महिन्यातून किमान तीन-चार वेळा देखभाल दुरुस्तीचे काम, पाईपलाईन फुटणे, विद्युत विषयक अशाप्रकारे वेगवेगळी कामे करण्यासाठी पालिकेचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येतो. त्या काळात पालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करायला हवा. मात्र, तसे होत नाही. नागरिकांना स्वत: पाण्याचे टॅंकर विकत घेण्याची वेळ वारंवार येत आहे. त्या टॅंकरच्या खर्चाचा भार सोसायटीवर पडू लागला आहे. पाणीपुरवठा खंडित होण्यामुळे सोसायटीचा खर्च वाढतच चालला आहे.
टँकर सप्लायर्सची चांदी
भोसरीसह महापालिकेतील समाविष्ट गावात पाणीपुरवठा विस्कळीत झाला, तर टॅंकरमालकांची चांदी होते. अनेकदा महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यावर टॅंकर भरून दिले जातात. तेथून पाण्याचे टॅंकर सोसायटीसह अनेक नागरी भागात पाणीपुरवठा करतात. एक टॅंकर किमान दोन ते अडीच हजार रुपये घेतात. त्यामुळे महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यावरून हे टॅंकरचालक पाणी घेऊन त्यांची विक्री करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे टॅंकरचालकांना धंदा चांगलाच तेजीत आहे.
प्रतिमाणसी १५० ऐवजी १३५ लिटर पाणी
दरम्यान, महापालिका प्रतिमाणसी १५० लिटर पाण्याऐवजी १३५ लिटर पाणी देते. तरीही भोसरीतील अनेक भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. नागरिकांच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत. तक्रार करणाऱ्या सोसायटीतील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचा सल्ला पाणीपुरवठा विभागाकडून दिला जातो. त्यामुळेच पिण्याचे पाणी खासगी टॅंकरने पुरविले जात आहे.