संग्रहित छायाचित्र
लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ऐनवळी मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्याने मतदारांची पंचाईत झाली होती. त्यामुळे घरातून मतदारांनी मोबाईल घेऊन आल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र, निवडणूक विभागाने विधानसभेलाही मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घातली आहे. गोपनीयतेचा भंग होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांच्या शंभर मीटर आत मोबाईल नेण्यास बंदी घातली होती. निवडणूक विभागाने मतदानाच्या दोन-तीन दिवस अगोदर अचानक घेतलेल्या या निर्णयाने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे मतदान केंद्रावर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर मतदारांचा वाद झाल्याचे प्रसंग पाहायला मिळाले. मोबाईल असलेल्या मतदारांना पोलीस मतदान केंद्रामध्ये सोडत नव्हते. मोबाईल ठेवायचा कुठे, असा प्रश्न मतदारांना भेडसावला होता. त्यामुळे पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी यांच्यातील एकाला मोबाईल घेऊन मतदान केंद्राबाहेर बसण्याची वेळ आली. तसेच काही नागरिक एकटेच मतदान केंद्रावर आले होते. त्यांना मोबाईल नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने त्यांनी पोलिसांशी काही वेळ वाद घालून सोडण्याची विनंती केली, पण पोलीस ऐकत नसल्याने मतदान करायचे नाही म्हणून ते परत माघारी निघून गेल्याचे दिसून आले. अनेक मतदारांना व्होटर स्लीपही मिळाली नव्हती. अनेकदा पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघात राजकीय पक्षांकडून मतदारांना व्होटर स्लीप दिली जाते, पण काही मतदारांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून व्होटर स्लीप डाऊनलोड करून घेतली. ही व्होटर स्लीप मोबाईलमध्येच साॅफ्ट काॅपी म्हणून ठेवली. परंतु, मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असल्याने त्यांची व्होटर स्लीपची साॅफ्ट काॅपीही मोबाईलमध्ये राहिली. ऐनवेळी मतदारांना त्या व्होटर स्लीपमधील क्रमांक हातावर लिहून घ्यावा लागला. त्याशिवाय मोबाईलही बाहेर कोणाकडे ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारांमध्ये निवडणूक आयोगाच्या नाहक अटीचा मतदारांना त्रास होऊ लागला होता.
दरम्यान, लोकसभेला अनेक मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोबाईल आत नेण्यास मनाई असल्याचा सूचना फलक लावण्यात आला होता. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अनेक मतदार मोबाईल घेऊन येत होते, पण त्यांना प्रवेशद्वारात अडवून मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे सांगितले. त्यानंतर मतदारांना माघारी पाठवले जात होते. शंभर मीटरच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय नसल्याने पोलीस प्रशासन आणि मतदार यांच्यामध्ये वादाचे प्रसंग ओढवत होते. तसेच अनेक मतदार मतदान न करताच घराकडे गेले. ते पुन्हा मतदानाला आले नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घातल्याने त्याचा मतदानावर परिणाम होणार का, हे पाहावे लागणार आहे.
मोबाईलबंदी कशासाठी?
मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करणे, मतदान केंद्रावर शांतता भंग करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.