संग्रहित छायाचित्र
पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाअंतर्गत (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पामध्ये रहिवाशांच्या विविध समस्या आहेत. गेल्या वर्षभरापासून त्या सुटल्या नाहीत. सदनिकांमधून होणारी पाण्याची गळती, निकृष्ट बांधकाम आणि एकूणच कामाचा दर्जा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमआरडीए आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत नोटीस बजावली होती. त्यात सुधारणा न झाल्याने बांधकाम व्यावसायिकाला लागू करण्यात आलेल्या दंडात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. आता या दंडाची धास्ती घेत संबंधित बांधकाम व्यावसायिकाने कामाचा निपटारा वाढवला आहे.
पीएमआरडीएने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प एक आणि दोन या ठिकाणी एकूण ४ हजार ८८३ सदनिका उभारल्या असून येथे सुमारे ७० टक्के लाभार्थी वास्तव्यास आहेत. यातील काही सदनिकाधारकांनी बाथरूम, टॉयलेट, टेरेस, पाणी टाकी गळतीबाबत प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती.
त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी थेट पीएमआरडीए आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेत संबंधित कंत्राटदाराला सदनिकाधारकांच्या अडचणी सोडवत त्यांना अटी-शर्तीनुसार कामे करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले. पण कंत्राटदाराच्या कामाची गती अपेक्षितरित्या होत नसल्यामुळे गृहप्रकल्प एक आणि दोन येथील कंत्राटदारास नोटीस बजावली होती. तसेच महिनाभराची मुदतही दिली होती. मात्र, अद्याप कामे झाले नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यापूर्वी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात आला होता. मात्र, त्याची कोणतीही धास्ती व्यावसायिकाने घेतली नव्हती. अखेर या दंडामध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता हा दंड दहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्याचप्रमाणे आता संबंधित ठेकेदाराच्या कामाचा आढावा घेण्याबाबत स्वतंत्र अधिकारीही नेमला आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या असून, इतरही समस्या प्राधान्याने सोडवण्यात येणार आहेत.
...तर फौजदारी कारवाई
सद्यस्थितीमध्ये सदनिकाधारकांच्या समस्या सोडवण्याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सूचना केल्या आहेत. मात्र, वेळेवर काम न झाल्यास यापुढे फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे झालेल्या कामाचा अहवाल आयुक्तांनी मागवला असून कामाच्या दर्जाबाबत त्रुटी आढळून आल्यास निश्चित कारवाई करण्यात येणार आहे, असे पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
पीएमआरडीए अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत
सेक्टर १२ प्रकल्पामध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या कामाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे कारवाई होईल. याखेरीज दोषी आढळणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालणाऱ्या पीएमआरडीए अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. त्याबाबतही माहिती आयुक्तांनी मागवली आहे.