हिंजवडीत आयटी पार्क परिसरात क्रेन कोसळली; पीएमआरडीए अनभिज्ञ
आयटीनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंजवडी (IT Park Hinjewadi) परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत. दरम्यान, रविवारी (६ ऑक्टोबर) रात्री आठ वाजता येथील एका बांधकाम साईटवर उभारण्यात आलेली क्रेन कोसळली (crane collapsed). रविवार असल्याने आयटी कंपनीला सुट्टीमुळे रस्त्यावर गर्दीत तुरळक होती. परिणामी, मोठा अनर्थ टळाला. याबाबत पीएमआरडी (PMRDA ) विभागाकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित विभागाला माहिती नसल्याचे समोर आले.
हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साइटवर ही क्रेन उभारण्यात आली होती; मात्र रविवारी रात्री आठच्या सुमारास ही क्रेन अचानक कोसळली व ऐन वर्दळीच्या रस्त्यावर पडली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार माण मार्गावरील एलप्रो शाळा आणि त्यासमोरच्या असलेल्या सोसायटीच्या मधील जागेत ही घटना घडली आहे. एलप्रो शाळेच्या बाजूने ही क्रेन सोसायटीच्या बाजूला कोसळली. सुदैवाने घटना घडली तेव्हा येथे जास्त वर्दळ नव्हती; तसेच वाहनांची संख्या कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
तसेच रविवारी बांधकाम कामगारांना साप्ताहिक सुटी असल्याने अनेक कामगार बांधकाम साईटवर नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. या परिसरात अनेक बांधकामे नव्याने सुरू असून अनेक नामवंत बांधकाम व्यावसायिक येथे आपली बांधकामे करत आहेत. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिक अनेकदा नियम धाब्यावर बसवतात. त्यातून अनेक लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडतात. याबाबत पीएमआरडीए विभागाला या घटनेची दिवसभर माहितीच नव्हती. त्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले. याबाबत बोलताना पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या सह नियोजनकार भाग्यश्री ढवळसंग यांनी सांगितले की, त्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.