Alandi : आळंदी यात्रेसाठी पुण्यातून ३४२ बस, भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी पीएमपीची स्पेशल बससेवा

कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त निमित्त श्री क्षेत्र आळंदी यात्रेसाठी ६ ते १२ डिसेंबर या कालावधी दरम्यान मार्गावरील ११३ व जादा २२९ सर्व मिळून ३४२ बसेस देण्यात येणार असल्याचे पीएमपीने जाहीर केले आहे.

Alandi : आळंदी यात्रेसाठी पुण्यातून ३४२ बस, भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी पीएमपीची स्पेशल बससेवा

संग्रहित छायाचित्र

पुणे : कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त निमित्त श्री क्षेत्र आळंदी यात्रेसाठी ६ ते १२ डिसेंबर या कालावधी दरम्यान मार्गावरील ११३ व जादा २२९ सर्व मिळून ३४२ बसेस देण्यात येणार असल्याचे पीएमपीने जाहीर केले आहे. तसेच ८ ते ११ डिसेंबर या चार दिवसांसाठी रात्रीच्या वेळी गरजेनुसार बससेवा देण्यात येणार आहे. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरीत करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बससेवेसाठी रात्री ११ वाजल्यानंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरा पेक्षा रूपये ५ जादा तिकिट दराने आकारणी करण्यात येणार आहे. तसेच, पीएमपीकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्राकालावधीत रात्री ११ वाजल्यानंतर जादा बससेवेसाठी या पासचा वापर करून प्रवास करता येणार नसल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आळंदी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी जादा बससेवा देणे आवश्यक असून ही बससेवा पीएमपीच्या सध्याच्याच बसेसमधून देण्यात येणार आहे. यासाठी शहरातील बसमार्गावरील संचलनात असलेल्या बसेसमधूनच काही बसेस कमी करून यात्रा स्पेशल बससेवा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे आळंदी मार्गावरील मार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ व मार्ग क्र. २५७ आळंदी ते मरकळ हे मार्ग यात्रेच्या काळात पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी संबंधित मार्गावरील प्रवाशी नागरिकांनी पीएमपीला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशी असेल स्पेशल बससेवा...

१- स्वारगेट ते आळंदी, २- हडपसर ते आळंदी, ३- पुणे स्टेशन ते आळंदी, ४- मनपा भवन ते आळंदी, ५- निगडी ते आळंदी, ६- पिंपरी ते आळंदी, ७- चिंचवड ते आळंदी, ८- देहूगांव ते आळंदी, ९- भोसरी ते आळंदी, १० - रहाटणी ते आळंदी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story