संग्रहित छायाचित्र
पिंपरी विधानसभा मतदार संघात दिवसभर संथ गतीने मतदान झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत पिंपरी मतदार संघात अवघे ४.४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर एक वाजेपर्यंत ११.४६ टक्के तर, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४२.७२ टक्के मतदान झाले होते. या मतदार संघात नेहमीच मतदानाच्या टक्केवारीबाबत थोडा निरुत्साह पाहायला मिळाला.
पिंपरी - चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा मतदार संघ हा आरक्षित मतदार संघ आहे. २०१९ मध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे हे आमदार म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळविले. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांचे आव्हान होते. पिंपरी मतदारसंघात अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत असा सामना रंगला आहे. पिंपरी एकूण १५ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
पिंपरी मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख ९१ हजार ६०७ एवढी आहे. आरक्षित मतदार संघ असूनही या मतदार संघाचे शहरात मोठे वर्चस्व असते. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदार संघ प्रत्येक पक्ष आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्राधान्य देतो. या मतदार संघातील लढत ही पहिल्यापासूनच चुरशीची बनली आहे. आपले असंख्य कार्यकर्ते आणि तगडी यंत्रणा राबवत अण्णा बनसोडे यांनी या मतदार संघावरील आपली पकड घट्ट बनविली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, सुशिक्षित उमेदवार म्हणून सुलक्षणा शिलवंत या मतदारांपर्यंत पोहचण्यात यशस्वी झाल्या आहेत. दरम्यान, या मतदार संघात नेहमीच मतदानाच्या टक्केवारीबाबत थोडा निरुत्साह पाहायला मिळाला आहे. यंदाही सकाळपासूनच मतदारसंघात अतिशय संथगतीने मतदान सुरू असल्याचे पाहायला मिळाले. सकाळी नऊ वाजता अवघे ४.४ टक्के मतदान झाले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४२.७२ टक्के मतदान झाले. यात एक लाख ६७ हजार २९६ मतदान झाले. यामध्ये ८८ हजार ४९७ पुरुष, ७८ हजार ८३१ महिला तर आठ इतर लोकांनी मतदान केले आहे.