संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया बुधवार (दि.२०) पार पडत असताना सकाळी सात वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने अजब फतवा काढल्याने मतदारात नाराजी उमटलेली दिसून आली. शंभर मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घातल्याने नागरिकांनी आणलेले मोबाईल ठेवायचे कोठे, असा प्रश्न पडला होता. त्यामुळे मतदारांनी एकाला मतदान केंद्राबाहेर ठेवून त्याच्याकडे मोबाईल देत मतदान केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर नागरिक आणि पोलिस यांच्यात किरकोळ मोबाईल वरुन वाद निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यामुळे अनेक मतदार नाराज होऊन मतदान न करताच माघारी जात असल्याचे दिसून आले.
चिंचवड विधानसभेत सकाळी ७ वाजता मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. सकाळी हवेत गारठा असल्याने मतदानाचा उत्साह थोडा कमी होता. सकाळी नऊ नंतर मतदानासाठी नागरिक सकाळी बाहेर पडले, त्यानूसार नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तास केवळ ६.८० टक्के मतदान झाले. यामध्ये २७ हजार ६४ पुरुष तर १७ हजार ९७४ महिलांनी मतदान केले. तर नऊ वाजल्यानंतर अकरा वाजेपर्यंत १६.९७ टक्के मतदान झाले. त्यामुळे सकाळी मतदारांचा उत्साह दिसून आला.
तर दुपारी एक वाजेपर्यंत २९.३४ टक्के आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ४०.४३ टक्के मतदान झाले होते. यामध्ये १ लाख ४५ हजार ५१२ पुरुष आणि १ लाख २२ हजार ७०८ असे एकूण २ लाख ६८ हजार ३२३ मतदारांनी मतदानाची हक्क बजाविला आहे.
मतदान केंद्रवरील अधिकारी कर्मचाऱ्यांकडे सर्रास मोबाईल
चिंचवड विधानसभेतील अनेक मतदान केंद्राच्या शंभर मीटर आता मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने काढलेल्या फतव्यामुळे मतदारातून नाराजी व्यक्त होत आहे. मतदान केंद्रावर बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर काही मतदाराचा वाद होत आहे. मोबाईल असलेल्या मतदारांना पोलीस मतदान केंद्रामध्ये सोडत नाही. मोबाईल ठेवायचा कुठे असा प्रश्न मतदारांना पडला होता. त्यामुळे पती-पत्नी, मित्र-मैत्रिणी यांच्यातील एकाला मोबाईल घेऊन मतदान केंद्राबाहेर बसण्याची वेळ आली.
तसेच काही नागरिक एकटेच मतदान केंद्रावर आले होते. त्यांना मोबाईल नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने त्यांनी पोलिसाची काही वेळ वाद घालून सोडण्याची विनंती केली. पण, पोलिस ऐकत नसल्याने मतदान करायचे नाही म्हणून ते परत माघारी निघून गेल्याचे दिसत होते. मात्र, पोलिस, मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचा-यांकडे मोबाईल आढळून आला होता. त्यामुळे मोबाईल बंदी केवळ मतदारांना आहे का? असा देखील प्रश्न मतदाना पडला होता.
व्होटर स्लिपदेखील मोबाईलमध्ये
अनेक मतदारांना व्होटर स्लीपदेखील मिळालेली नाही. चिंचवड मतदारसंघात राजकीय पक्षाकडून मतदारांना व्होटर स्लीप दिली जाते. पण, काही मतदारांना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन व्होटरस्लीप डाऊनलोड करुन घेतलेली. ही व्होटर स्लीप मोबाईलमध्येच साॅफ्ट काॅपी म्हणून ठेवली. परंतू, मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असल्याने त्यांची व्होटर स्लीपची साॅफ्ट काॅपीदेखील त्या मोबाईलमध्ये राहिली. ऐनवेळी मतदारांना त्या व्होटर स्लीपमधील क्रमांक हातावर लिहून घ्यावा लागला. त्याशिवाय मोबाईलदेखील बाहेर कोणाकडे ठेवण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारांमध्ये निवडणूक आयोगाच्या नाहक अटीचा मतदारांना त्रास होवू लागला होता.
मतदान केंद्राच्या १०० मीटर अलीकडेच नागरिकांना मोबाईल बाहेर ठेवा असा फतवा निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाला. मात्र दुसरीकडे पिंपरी विधानसभेतील महायुतीचे उमेदवार, आमदार अण्णा बनसोडे यांना मतदान करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने नियम सर्वांना सारखे आहेत का असा सवाल नागरिकांमधून विचारला जात होता.