रंगतदार लढतींमुळे निकालाबाबत उत्सुकता; पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळमध्ये शांततेत मतदान

यंदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये थेट लढत झाली. तर मावळमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष अशी लढत झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस दिसून आली. पिंपरी चिंचवड पोलीस महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या (जिल्हाधिकार्यालय) योग्य नियोजनामुळे सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Thu, 21 Nov 2024
  • 03:00 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

यंदा  महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये थेट लढत  झाली. तर मावळमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष अशी लढत झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चुरस दिसून आली. पिंपरी चिंचवड पोलीस महापालिका आणि निवडणूक आयोगाच्या (जिल्हाधिकार्यालय) योग्य नियोजनामुळे सर्व केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे तर महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत यांच्यामध्ये थेट लढत झाली. पिंपरीमध्ये दुपारी एक नंतर मतदार बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी मतदार संघात अण्णा बनसोडे यांची चांगली पकड आहे. जोडलेले हजारो कार्यकर्ते आणि उभारलेली निवडणूक यंत्रणा यामुळे अण्णा बनसोडे यांनी या मतदार संघावर चांगली पकड मिळवली आहे. तर, शरद पवार यांच्याशरोबर पहिल्यापासून थांबलेल्या निष्ठावान कार्यकर्त्या आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून सुलक्षणा शीलवंत यादेखील मतदारांपर्यंत पोहोचल्या. त्यामुळे सुरुवातील एका बाजूला वळलेली ही लढत चांगलीच चुरशीची झाली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीकडून ऐन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले राहुल कलाटे यांच्यात लढत झाली. सुशिक्षित बहुल परिसर म्हणून चिंचवड मतदार संघाकडे पाहिले जाते सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत या भागात मतदान झाले त्यानंतर ऊन वाढल्यावर येथील मतदानाचा टक्का थोडा कमी झाला. मात्र त्यानंतर पुन्हा साडेतीननंतर सहा वाजेपर्यंत या ठिकाणी मतदार घराबाहेर पडण्याचे पाहायला मिळाले.

भोसरीमध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यात लढत झाली आहे. सकाळपासून भोसरी मतदारसंघात मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. कुदळवाडी परिसरात मात्र निवडणूक आहे की नाही अशीच परिस्थिती दिसून येत होती. भोसरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्यासाठी दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्याने वातावरणात रंगत आली. तर दुसरीकडे अजित गव्हाणे यांच्यासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या सभेत गर्दीने सर्व रेकॉर्ड मोडले. पिंपरी-चिंचवड शहराला जोडूनच असलेल्या मावळ विधानसभेत महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष उमेदवार माजी आमदार बापू भेगडे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. मावळ मधील निम्म्याहून अधिक भाजपने त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पाठिंब्याने बापू भेगडे यांनी निवडणूक लढविली. मावळमधील दुर्गम भागासह शहरी भागात सकाळपासून नागरिक मतदानाकरिता घराबाहेर पडले होते.

भोसरीत तब्बल ७००० मतदार वगळले?

भोसरी विधानसभा मतदारसंघातील सात हजार मतदार वगळल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या लोकांनी मतदान केले त्या मतदारांची नावे मतदान केंद्रावर गेल्यानंतर आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडे असलेल्या यादीतून गायब असल्याचे दिसून आले. तसेच या ७००० मधील बहुतांश मतदार हे मुस्लिम समाजाचे असल्याचे देखील गव्हाणे यांचे म्हणणे आहे.

मावळमध्ये हजाराहून अधिक मतदानावर आक्षेप

मावळमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप करीत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी एक हजाराहून अधिक मतदानावर किंबहुना मतदारांवर आक्षेप नोंदविला. बोगस मतदान होण्याची शक्यता लक्षात घेऊन बापू भेगडे यांनी साडेचारशे कार्यकर्त्यांची एक फौज केवळ बोगस मतदान शोधण्याकरिता तयार ठेवली होती. या कार्यकर्त्यांनी ४०८ मतदान केंद्रांवर झालेल्या एकूण मतदानामध्ये एक हजाराहून अधिक मतदानावर आक्षेप नोंदविला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story