संग्रहित छायाचित्र
इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सोमवारी वादग्रस्त हिजाब आणि पवित्रता कायद्यावर बंदी घालत हा कायदा मागे घेतला. या कायद्यातील वादग्रस्त तरतुदींमुळे हा कायदा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विवादास्पद ठरला होता. दि. १३ डिसेंबर पासून हा कायदा अमलात येणार होता, मात्र देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याला वाढता विरोध पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
इराणचे अध्यक्ष मसूद पजशकियान म्हणतात की हा कायदा अस्पष्ट आहे आणि अजूनही सुधारणांची गरज आहे. त्यातील काही तरतुदींचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या कायद्यानुसार केस, हात आणि पाय पूर्णपणे न झाकणाऱ्या महिलांना १५ वर्षे तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनलसह अनेक मानवाधिकार संघटनांनी या कायद्यावर टीका केली आहे.
महिला गायिका परस्तु अहमदीला गेल्या आठवड्यात अटक झाल्यानंतर हिजाब कायद्याबाबतची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. परस्तु अहमदी यांनी बुधवारी, ११ डिसेंबर रोजी या मैफिलीचा व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये अहमदी स्लीव्हलेस ड्रेस घालून गाणे म्हणत होत्या. हा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर गुरुवारी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर परस्तु अहमदीला शनिवारी अटक करण्यात आली.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, तीनशेहून अधिक इराणी कार्यकर्ते, लेखक आणि पत्रकारांनी अलीकडेच या नवीन कायद्याला बेकायदेशीर ठरवत एका याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनीही हिजाब कायद्याला अनेकदा विरोध केला आहे. नैतिक पोलिसिंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.