माथेफिरू डॉक्टरने चिरडले ख्रिसमसचे मार्केट; २ ठार, ६८ जखमी

बर्लिन : जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने लोकांवर कार घातली. या चेंगराचेंगरीत २ व्यक्तींचा मृत्यू झाला असून ६८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपी हा ५० वर्षीय सौदी अरेबियाचा डॉक्टर तालेब आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Dec 2024
  • 05:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सौदीतील डॉक्टरने भरधाव कारने लोकांला चिरडले

बर्लिन : जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये शुक्रवारी एका व्यक्तीने लोकांवर कार घातली. या चेंगराचेंगरीत २ व्यक्तींचा  मृत्यू झाला असून ६८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील आरोपी हा ५० वर्षीय सौदी अरेबियाचा डॉक्टर तालेब आहे. तालेब जर्मनीच्या पूर्वेकडील सॅक्सनी-अनहॉल्ट राज्यात राहतो. या डॉक्टर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मॅग्डेबर्गचे प्रीमियर रेनर हॅसलहॉफ यांनी मीडियाला सांगितले की, आम्ही हल्लेखोराला अटक केली आहे. तो सौदी अरेबियाचा नागरिक असून २००६ पासून जर्मनीत राहतो. हा हल्ला देशासाठी आणि शहरासाठी आपत्ती आहे.

हॅसेलॉफ पुढे म्हणाले - यावेळी आम्हाला जे माहिती आहे त्यानुसार तो एकटाच हल्लेखोर होता, त्यामुळे यापुढे कोणताही धोका असल्याचे आम्हाला वाटत नाही. मात्र, हल्लेखोराचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

मॅग्डेबर्गच्या ख्रिसमस बाजाराची वैशिष्ट्ये
मॅग्डेबर्ग ही जर्मनीच्या सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याची राजधानी आहे. हे शहर एल्बे नदीच्या काठावर वसलेले असून त्याची लोकसंख्या अंदाजे २.४० लाख आहे. हे शहर बर्लिनपासून दीड तासाच्या अंतरावर आहे. मॅग्डेबर्ग येथे वर्षातून एकदा ख्रिसमस बाजार भरतो आणि मोठ्या प्रमाणात गर्दी खेचते.

हल्लेखोराला २०१६ मध्ये निर्वासित दर्जा मिळाला होता
द गार्डियनच्या वृत्तानुसार, हल्लेखोराचे नाव तालेब आहे. तो मानसोपचार तज्ज्ञांचा सल्लागार आहे. तालेब २००६ पासून जर्मनीत राहत होता आणि २०१६ मध्ये त्याला निर्वासित दर्जा मिळाला होता. मॅग्डेबर्ग शहरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नबर्गमध्ये तो औषधोपचार करत होता. हल्ल्यापूर्वी त्याने बीएमडब्ल्यू कार भाड्याने घेतली होती. सद्यस्थितीत हल्लेखोराचा कट्टरवाद्यांशी संबंध आढळून आलेला नाही.

जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी एक्सवर याबद्दल लिहिले - मॅग्डेबर्गच्या अहवालांमुळे भीती निर्माण होते. माझे विचार पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. आम्ही त्यांच्यासोबत आणि मॅग्डेबर्गच्या लोकांसोबत उभे आहोत. प्रीमियर रेनर हॅसलहॉफ म्हणाले की, चांसलर स्कोल्झ शनिवारी घटनास्थळाला भेट देतील.

डाय वेल्ट न्यूजनुसार, हल्लेखोराच्या कारच्या पॅसेंजर सीटवर काही वस्तू सापडल्या आहेत. त्यात स्फोटक यंत्र होते की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तपास अधिकारी कोणतीही शक्यता नाकारत नाहीत. या हल्ल्यात १५ जण गंभीर जखमी झाल्याचे मॅग्डेबर्ग शहर प्रशासनाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही घटना १९ डिसेंबर २०१६ रोजी बर्लिनमधील एका मोठ्या दहशतवादी घटनेची आठवण करून देणारी आहे, जेव्हा एका इस्लामिक अतिरेक्याने ख्रिसमस मार्केटमध्ये गर्दीवर ट्रक नेला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता तर डझनभर जखमी झाले होते. तो हल्लेखोर काही दिवसांनी इटलीमध्ये पोलिसांच्या चकमकीत मारला गेला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest