संग्रहित छायाचित्र
वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानवर लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे बनवल्याचा आरोप केला. या आरोपापाठोपाठ क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित चार पाकिस्तानी कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानची सरकारी एरोस्पेस आणि संरक्षण संस्था, नॅशनल डेव्हलपमेंट कॉम्प्लेक्स (एनडीसी) देखील समाविष्ट आहे.
वृत्तसंस्था एएनआयने अमेरिकेच्या हवाल्याने म्हटले आहे की, चार बंदी घातलेल्या कंपन्या पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी आवश्यक साधने पुरवत आहेत. अमेरिका भविष्यातही अशा कारवायांविरोधात कारवाई करत राहील.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानची शाहीन-सिरीजची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे एनडीसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहेत. याशिवाय कराचीच्या अख्तर अँड सन्स प्रायव्हेट कंपनीवर एनडीसीला क्षेपणास्त्र संबंधित मशीन खरेदीमध्ये मदत केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी अमेरिकेचा हा निर्णय दुर्दैवी आणि पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या बंदीमुळे आपल्या प्रादेशिक स्थिरतेला हानी पोहोचेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरता राखण्यासाठी हा कार्यक्रम आवश्यक होता.
त्याच वेळी, आणखी एक पाकिस्तानी कंपनी रॉकसाइड एंटरप्राइझ आणि एफिलिएट इंटरनॅशनलवरही पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात सहकार्य केल्याचा आरोप आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने चीनच्या तीन कंपन्यांना पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान पुरवण्यावर बंदी घातली होती. या यादीत बेलारूसच्या एका कंपनीचाही समावेश होता.
पाकिस्तानचे शाहीन बॅलिस्टिक किती शक्तिशाली आहे?
नोव्हेंबर २०१९ मध्ये पाकिस्तानने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या शाहीन-१ क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्याची रेंज ६५० किमी पर्यंत आहे. हे सर्व प्रकारची शस्त्रे वाहून नेऊ शकते. याशिवाय पाकिस्तानने शाहीन-२ आणि शाहीन-३ क्षेपणास्त्रांची चाचणीही केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.