टोलचे पैसे कुठे जातात, कळायला हवे : राज ठाकरे
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासोबत शुक्रवारी (दि. १३) झालेल्या बैठकीनंतर टोल वसुलीविरोधात (Toll collection) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलचे पैसे जातात कुठे, असा सरकारला अडचणीचा ठरणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
टोल वसुली बंद करा, नाही तर टोल नाके जाळून टाकू, असा स्पष्ट इशाराच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यानंतर राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या संदर्भात शुक्रवारी मंत्री दादा भुसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर झाली. यानंतर ‘‘टोलमाफीचा प्रश्न नंतर येतो. टोलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि इतर वाहनांकडून वसूल केले जाणारे पैसे जातात कुठे? त्याच्या हिशेबाचे काय,’’ असा सवाल राज यांनी पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेत राज यांनी भुसे यांच्यासोबत बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘मुंबईच्या एंट्री पॉइंटवर पुढील १५ दिवस वाहने मोजण्यासाठी सरकारकडून कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच मनसेच्या वतीनेही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. टोल नाक्यासंदर्भात करारात नमूद केलेल्या सर्व सोईसुविधा, यामध्ये स्वच्छ स्वच्छतागृह, प्रथमोपचारासाठी लागणारी सेवा, एक रुग्णवाहिका, प्रकाश यंत्रणा आदी सुविधा टोल नाक्यांवर करावी लागणार आहे. टोल नाक्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी मंत्रालयात एक यंत्रणा तयार केली जाणार आहे. टोलनाक्यांवर काय समस्या जाणवत आहेत, त्या नोंदवण्यासाठी एक मोबाइल नंबर दिला जाणार आहे.’’ प्रत्येक टोलनाक्यावर पूर्वी जी यलो लाइन होती, ती पुन्हा सुरू केली जाणार आहे. या यलो लाइनच्या बाहेर वाहनांची रांग गेल्यानंतर रांग कमी होईपर्यंत सर्व गाड्या टोल न घेता सोडल्या जाणार आहेत. एका टोल नाक्यावर चार मिनिटांपेक्षा जास्त वाहन उभे राहणार नाही. टोलसाठी किती रुपयांचे टेंडर आहे, आतापर्यंत किती पैसे वसूल झाले आणि अजून किती पैसे जमा होणे बाकी आहे, याची माहिती देणारा टोलनाक्यावर मोठा बोर्ड लावण्यात येणार आहे. याची सर्व माहिती प्रवाशांना पाहता येईल, असेही राज यांनी सांगितले.