संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष फोडून अजित पवार यांचा एक मोठा गट शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले आहे. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाने शिंदे गटाइतकाच वाटा मागितल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या अपेक्षा वाढत आहेत. कॅबिनेट विस्तार आणि महामंडळ वाटपात शिंदे गटा इतकाच वाटा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला पाहिजे आहे. अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा हट्ट पूर्वीपासून धरला होता. त्यांचा हा हट्ट पूर्ण झाल्यानंतर आता पालकमंत्री पदानंतर आता महायुतीत नवा पेच निर्माण झाला आहे.
लवकरच शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवी अट घातल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली पाहिजे. या अटीमुळे शिंदे गटात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे. आता कॅबिनेट विस्तार झाल्यास शिंदे गटास जितके कॅबिनेट राज्य मंत्री आणि महामंडळ दिले जातील, तितकेच राष्ट्रवादी पक्षाला दिले जावे, अशी भूमिका अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. अजित पवार यांची संमती असल्याशिवाय त्यांच्या गटाकडून अशी मागणी पुढे येणे शक्य नसल्याने या विषयावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीने ठेवलेल्या प्रस्तावामुळे महायुतील मित्र पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधल्या वादामुळे राज्य सरकारची प्रतिमा खराब होत आहे. त्यात सुधारणा करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. दिल्ली दौ-यात शिंदे आणि फडणवीसांना ही सूचना करण्यात आली होती. तसंच पालकमंत्री पदाची नियुक्ती, मंत्रिमंडळाचा विस्तार यावर लवकरच निर्णय करा अशी सूचनाही अमित शाह यांनी शिंदे-फडणवीसांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये दिल्लीत साडेतीन तास बैठक झालीय. राज्यातील राजकीय घडामोडी, तसंच अजित पवारांच्या नाराजी नाट्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. यासोबतच मंत्रिमंडळ विस्तार, आरक्षण, आमदार अपात्रतेवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
अजित पवार अखेर पुण्याचे पालकमंत्री झाल्याने या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. चंद्रकांत पाटलांची पुण्याच्या पालकमंत्रिपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी राज्य सरकारकडून बुधवारी (दि. ४) जाहीर करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्याकडील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काढण्यात येऊन त्यांना सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्रिपद देण्यात आलं. अनेकदा आश्वासन देऊनही पालकमंत्रिपदाचं वाटप होत नसल्यानं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारने पालकमंत्री नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे : अजित पवार, अकोला : राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर : चंद्रकांत पाटील, अमरावती : चंद्रकांत पाटील, वर्धा : सुधीर मुनगंटीवार, भंडारा : विजयकुमार गावित, बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर - हसन मुश्रीफ, परभणी : संजय बनसोडे गोंदिया : धर्मरावबाबा आत्राम, बीड : धनंजय मुंडे, नंदूरबार : अनिल पाटील