"राष्ट्रवादीच्या मोठ्या मुन्नीला बोलायला लावा", सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर कराडवर मकोका गुन्हा लावल्याच्या निषेधार्थ कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. परळीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार सुरेश धस यांनी ‘आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, दुकाने बंद करायची, आरडाओरडा करायचा, असा नवीन परळी पॅटर्न आता सुरु झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा’, असं म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्या आईची भेट घेतल्याबद्दल धस यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, अहो घेतलीत पाहिजे ना. वाल्मिक कराड च्या मातोश्रीला जावून भेटलं पाहिजे. त्याच्या कुटुंबाला जावून भेटलं पाहिजे. ते आता ३०२ मध्ये गेले आहेत. ते जावून भेटले असतील. भेटायचं कामच आहे त्यांचं. त्यात विशेष असं काही नाही.
त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचे नाही. एखाद्या महिलेच्या, भगिनीच्या बाबतीत बोललं ते फोकस सगळा दुसरीकडं जातो. माझी विनंती आहे की तुम्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा.
केवळ मोक्का लागला म्हणजे प्रकरण संपलं आहे का? उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अजून बाकी आहे. ही केस व्यवस्थित चालवली जातेय की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आका पर्यंत सापडलं आकाच्या पुढं काही सापडतंय का? हे एकच सोटमुळ ताब्यात आलेलं आहे. आगंतुक मुळं अजून बाकी असल्याचं धस म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीत धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती का? असं विचारलं असता धस म्हणाले, माझ्या मतदारसंघाचं काम होतं. त्याबद्दल त्यांच्याशी बोलणं झालं.