संग्रहित छायाचित्र
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पीडित तरुणी हिने बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, रघुनाथ उचित यांचा जामीन तब्बल १७ महिन्यानंतर न्यायालयाने रद्द केला आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पीडित तरुणीने बलात्कार आणि गर्भपाताचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये कुचिक यांना शिवाजीनगर न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, कुचिक यांनी यातील काही अटी व शर्तींचे पालन केले नव्हते.
त्यामुळे पीडितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दिले होते. त्यानुसार पीडीतेमार्फत ॲड. सागर दुर्योधन शिंदे यांनी कुचिक यांना मिळालेला जामीन रद्द करावा म्हणून शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता ४३९ (२) अन्वये अर्ज केला होता. या अर्जावर ॲड. सागर दुर्योधन शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून रघुनाथ कुचिक यांना दिलेला जामीन कोर्टाने रद्द केला आहे. तसेच आरोपी रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात आता अजामीन पात्र वारंट काढले आहे. तब्बल १७ महिन्यानंतर कुचिक यांचा जामिन अर्ज रद्द झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.