संग्रहित छायाचित्र
निवडणुकीच्या काळात केवळ विरोधकांच्याच बॅगांची तपासणी होत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला. ‘‘परभणीमध्ये माझ्यादेखील बॅगा तपासण्यात आल्या होत्या, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यादेखील बॅगा तपासल्या गेल्या होत्या. मात्र, अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी तक्रार करणे, आरोप करणे हे चुकीचे आहे,’’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या माध्यमातून असे होत असल्याचा आरोप विरोधक करत असतील तर आमच्या सोबत असणाऱ्या पोलिसांच्याही बॅगा तपासा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आमची भूमिका मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे, असे अजित पवार यांनी आवर्जून नमूद केले. मी साडेबारा टक्के आदिवासी, साडेबारा टक्के मागासवर्गीय आणि साडेबारा टक्के महिलांना उमेदवारी दिली असल्याचा दावा अजित पवार यांनी केला . आम्ही निवडून आलो तर आम्ही सर्वांगीण विकास करू, असे प्रत्येक जण सांगतो. मात्र, मी बारामती मतदारसंघामध्ये हे प्रत्यक्षात करून दाखवले, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकवला आहे. त्याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला हवे. प्रत्येकाने सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षांचा आदर ठेवला पाहिजे. सर्वांना रिस्पेक्ट द्यायला हवा. जे समाज मान्य करणार नाही, जे सुसंस्कृतपणामध्ये बसत नाही, अशा प्रकारचे वागणे आपले नसावे, असे म्हणत अजित पवार यांनी वाचाळवीरांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.