संग्रहित छायाचित्र
सोलापूर : मी सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रचाराला आलो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष सोबत आहेत. अशा वेळी अपक्षांचे मांजर आडवे जाऊ नये, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी रविवारी (१० नोव्हेंबर) रात्री सोलापुरात केले. खासदार प्रणिती शिंदे यांनी शिवसेनेने दिलेला उमेदवार अमर पाटील यांचा प्रचार केला पाहिजे, असे जाहीर आवाहन ठाकरे यांनी केले. सुशीलकुमार शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे जुने मित्र आहेत. लोकसभेला तुमच्या प्रचाराला मी आलो होतो याची आठवणही त्यांनी प्रणिती शिंदेंना करून दिली.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जुळे सोलापूर येथे ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील भाजपच्या कारभारावर आसूड ओढत मोदी-शहा व फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. याचवेळी त्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीवर आणि महाआघाडीच्या बंडखोरीवरही भाष्य केले. यावेळी मंचावर उमेदवार अमर पाटील, आमदार मिलिंद नार्वेकर, अनिल कोकीळ, शरद कोळी, पुरुषोत्तम बर्डे, अजय दासरी आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते. सांगोला येथे सभा आटोपून ठाकरे हे सायंकाळी सोलापुरात आले. काही वेळ थांबून रात्री आठ वाजता सभास्थानी दाखल झाले. ठाकरे जवळपास एक तासभर बोलले. सभेसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. महाविकास आघाडीच्या सभेला स्थानिक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची अनुपस्थिती होती. केवळ जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हजर होते, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे मंचावर होते. त्यांनी ठाकरेंचे स्वागत करून चरणस्पर्श केले. अमर पाटील यांच्यासोबत त्यांचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील, काका माजी आमदार रविकांत पाटील हेही उपस्थित होते. पाटील कुटुंबातील प्रमुख नेते प्रथमच मंचावर दिसले.
मते फुटल्यास ते डोक्यावर बसतील
स्थानिक संदर्भ देत तिन्ही पक्षांच्या चिन्हांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्याचा महाराष्ट्र सामर्थ्यशाली बनवण्याचे स्वप्न आपण बघत आहोत, त्यात अपक्षांचे मांजर आडवे जाऊ नये. मते कापण्यासाठी कोणाला उभे केले असेल तर आणि त्यातून फूट पडली तर तेच डोक्यावर बसतील. हे पाप होऊ द्यायचे नाही त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे तुम्ही प्रचारात उतरा. महाविकास आघाडीसाठी काम करा, आघाडीचा धर्म टिकवायचा आहे, एकजूट टिकवायची आहे त्यात फूट पडता कामा नये.