संग्रहित छायाचित्र
कर्जत जामखेड : सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून प्रत्येक उमेदवार प्रचाराला लागला आहे. मतदारसंघातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला जनतेलाही दिसत आहे. राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या लढतींपैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ. भाजपचे राम शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीचे रोहित पवार यांच्यात ही लढत होत असून सध्या स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा प्रचारात गाजत आहे.
२०१९ मध्ये कर्जत-जामखेड (Karjat Jamkhed) मतदारसंघामध्ये माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात सरळ लढत झालेली पाहायला मिळाली. या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा ४७ हजार ३४७ मतांनी पराभव केला. गेल्या वेळी रोहित पवार यांची पाटी कोरी होती तरीही भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा गाजला. या वेळेस पाच वर्षांत रोहित पवारांनी केलेल्या विकासकामांचा हिशोब होणार आहे. तरीदेखील पुन्हा एकदा यंदाच्या निवडणूक प्रचारामध्ये स्थानिक भूमिपुत्रविरुद्ध बाहेरचा उमेदवार हा मुद्दा गाजत आहे. आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांनी आपला तो आपलाच असतो, असे सांगत बाहेरचा विरुद्ध स्थानिक भूमिपुत्र असा मुद्दा पुढे करायला सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत रोहित पवारांनी कोणतीही महत्त्वपूर्ण कामे न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
राम शिंदे (Ram Shinde) व त्यांच्या समर्थकांनी भूमिपुत्रविरुद्ध बाहेरचा उमेदवार या सुरू केलेल्या मुद्द्यावर बोलताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, स्थानिक भूमिपुत्र हा प्रश्न विचारायचाच असेल तर राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी यांना पण विचारावा. यावर राम शिंदे यांनी, मी पाच वर्षांत केलेल्या कामांचा हिशोब पुराव्यासहित मांडतो. पवारांनी त्यांच्या पाच वर्षांतील कामे दाखवावीत, असे आव्हान दिले आहे.
कुठे गेले सगळे पीए?
मतदारसंघात काही विकासकामे होतील, या आशेने मागच्या निवडणुकीत रोहित पवारांना संधी देण्यात आली. मात्र आता रोहित पवारांच्या पक्षातील पदाधिकारी सोडून जात आहेत. स्थानिक कामे घेऊन आलेल्या सहकाऱ्यांना पीएला भेटण्याचे सल्ले देणाऱ्या रोहित पवारांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना डावलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रोहित पवारांचे एकेकाळचे समर्थकही आता प्रचारासाठी रोहित पवारांनी आपल्या पीएनाच बोलवावे, म्हणत आहेत. एकीकडे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार या मुद्द्याला तोंड देत असतानाच पदाधिकाऱ्यांच्या भावना जपणे रोहित पवारांना महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे त्यांची एकंदरीत तारेवरची कसरत होत असलेली पाहायला मिळते. कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसीचा मुद्दा, दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा श्रेयवादाचा मुद्दा याचबरोबर भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार हे मुद्दे गाजणार आहेत. येणाऱ्या काळात कर्जत जामखेडची जनता कोणाच्या बाजूने कौल देतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.