संग्रहित छायाचित्र
मुंबई: महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागणार हे उघड झाले आहे. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणारा पक्ष अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्येही थेट मुंबईत मोठी बंडखोरी झाली असून पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. आशिष शेलार यांनी भाजपच्या या वरिष्ठ नेत्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही या नेत्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळेच भाजपला या हक्काच्या मतदारसंघामध्ये फटका बसू शकतो.
भाजपविरोधात बंड करणाऱ्या माजी खासदाराचे नाव आहे, गोपाळ शेट्टी. भाजपने गोपाळ शेट्टींना उमेदवारी अर्ज नाकारल्याने बोरिवलीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने मुंबई उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांना बोरीवलीमधून उमेदवारी दिल्याने शेट्टी नाराज झाले आहेत. आयात उमेदवारांना संधी दिले जाते अशी शेट्टी यांचा आक्षेप आहे. संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेते नाराज असून नाराज स्थानिक नेत्यांमध्ये गोपाळ शेट्टींबरोबरच शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रविण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. यापूर्वीही या मतदारसंघातून विनोद तावडे, सुनिल राणे हे उमेदवार देण्यात आले होते. आयात उमेदवारांच्या मुद्द्याला कंटाळून आता स्थानिकांनी पक्षाविरुद्ध बंड केले आहे. रस्त्यावर उतरून गोपाळ शेट्टी समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे या मतदारसंघात पाहायला मिळाले. नाराज गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार गोपाळ शेट्टी यांच्या भेट घेतली. मात्र त्यांना गोपाळ शेट्टींची समजूत घालण्यात अपयश आले. त्यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप आमदार योगेश सागर गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले होते. मात्र त्यांनाही यात यश आले नाही. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपने शिंदेंच्या पक्षासोबत केलेल्या तडजोडीमुळे त्यांना मुंबादेवीमध्येही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. येथे अतुल शाह यांनी बंडखोरी केली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाला आहे. त्यामुळेच इथे तडजोड करुन इथून शिंदेंनी भाजपमधून पक्ष प्रवेश केलेल्या महिला नेत्या शायना एनसी यांना उमेदवारी दिल्याने अतुल शाह यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. घाटकोपरमध्येही पराग शाह यांना तिकीट दिल्याने प्रकाश मेहता यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.