संग्रहित छायाचित्र
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. संपूर्ण राज्यात अर्ज भरण्यासाठी मोठी लगबग सुरू आहे. त्याचवेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अनिस अहमद (Anis Ahmed) यांनी तिकीट न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा दिला आहे. अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. ते आता 'वंचित'कडून मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
अनिस अहमद यांनी यापूर्वी सलग तीन वेळा मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. ते यंदाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही होते. पण, काँग्रेस (Congress) पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले बंटी शेळके यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होत अहमद यांनी पक्षाचा राजीनामा दिला. विदर्भातील काँग्रेसचा मुख्य मुस्लीम चेहरा अशी अहमद यांची ओळख होती. गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणूनही ते प्रसिद्ध होते. विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केले आहे.
अहमद यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला नागपूर मध्य, नागपूर उत्तर, नागपूर दक्षिण आणि कामठी या मतदारसंघात फटका बसू शकतो. या सर्व मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. अहमद यांना यापूर्वी असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मंजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमन (एआयएम आयएम) पक्षानेही तिकीट ऑफर केल्याची चर्चा होती. मुस्लीम समुदायातील ९९ टक्के मते काँग्रेसला मिळतात. पण, त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्याकडं दुर्लक्ष होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसने एकही मुस्लीम उमेदवार दिला नव्हता. विधान परिषदेच्या निवडणुकीतही तीच परिस्थिती होती. संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व हवे असल्याने आपण बंडखोरी करत असल्याची प्रतिक्रिया अहमद यांनी व्यक्त केली आहे.