...अन्यथा पुण्यात मोठं आंदोलन उभं करणार, मुस्लिम समाजाचा इशारा
पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन कऱण्यात आले होते. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार आमदार नितेश यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप नेते नितेश राणे तसेच आमदार महेश लांडगे, मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आज मुस्लिम नागरिकांनी पुणे पोलीस आय़ुक्तांची भेट घेतली आहे.
"भाजप नेते नितेश राणे व आमदार महेश लांडगे तसेच समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी सोमवारी पुणे महापालिकेसमोर प्रशोभक भाषणे करून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर तात्काळ पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करावा", अशी मागणी मुस्लिम समाजाने पोलीस आयुक्तांकडे केली. तसेच जर गुन्हा दाखल नाही झाला तर पुण्यातील मुस्लिम समाजाकडून शहरात मोठे आंदोलन उभे केलं जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप नेते आक्रमक झाले होते. भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला ४८ तासांमध्ये अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला. यावेळी आमदार राणे यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. सर्वधर्मसमभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही. हे हिंदूराष्ट्र आहे त्यामुळे आधी हिंदूचे हित बघितले जाईल मग इतरांना बघितले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आपण घोडा हत्याराची भाषा करणार नाही आम्ही थेट कापतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.