संग्रहित छायाचित्र
उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना लांडग्याचे लबाड पिल्लू आणि खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांना लांडग्याची लेक म्हणणे आमदार गोपीचंद पडळकर यांना भोवण्याची चिन्हे आहेत. नागरिकांच्या भावना दुखावल्याबद्दल आणि निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड. असीम सरोदे व अन्य कायदेतज्ञामार्फत सदर नोटीस बजावत सात दिवसात लेखी माफी मागण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
नोटिशीत म्हटले आहे की, अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आणि सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक'' अशी वादग्रस्त व अवमानकारक विधाने पडळकर यांनी २३ सप्टेंबरला केली होती. यावरून बारामतीसह पुणे जिल्ह्यात संताप व्यक्त होत होता. अजित पवार हे पाच वेळा उपमुख्यमंत्री तर सुळे या संसदरत्न खासदार आहेत. मताधिक्याने विजयी होणारे लोकप्रतिनिधी आहेत. याउलट पडळकर यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन खोटी माहिती निवडणूक आयोगास दिली आहे. दंडेली पोलीस ठाण्यात दाखल असलेला फसवणुकीचा गुन्हा व अन्य गुन्हे लपवले. एका वाहिनीवर पडळकरांनी गुन्हे कबूलही केले. असे असताना पवार कुटुंबीयांबाबत बदनामीकारक, बेताल, अश्लाघ्य वक्तव्य केले. ते सोशल मीडियात व्हायरल झाल्याने सायबर गुन्हा घडला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजातील वातावरण दूषित व्हावे म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य केले आहे.
यादव म्हणाले, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सात दिवसात पवारसाहेब, अजितदादा व सुप्रियाताई यांची स्वतंत्रपणे लेखी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी शरद पवारांवर अनेक वेळा टीका केली आहे. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्यावरून अजित पवार नेहमी त्यांना टोमणे मारत असतात.