संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता या दोघांमधील वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला असून त्यामुळेच अजित पवार यांनी गणेशोत्सवात ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याचे देखील टाळले.
औपचारिकता म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्रिमंडळातील सर्व सहकारी गणपतीचे दर्शन घेतात. एरवी दिलदार स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवार यांनी ही औपचारिकतादेखील न दाखवल्यामुळे या दोघांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त फाटल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या एका नेत्याने या प्रकरणाला फारसे महत्त्व न देता ‘‘उगाच खाजवून खरूज आणू नका,’’ असे विधान करत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पवार गटाकडून या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात न आल्याने दोघांत नक्कीच काहीतरी मोठे बिनसले आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून शाहरूख खान, सलमान खान आदी बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहकाऱ्यांसह ‘वर्षा’ वर जाऊन दर्शन घेतले. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे टाळल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी शिंदे यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यावेळीही अजित पवार त्यांच्यासोबत दिसले नाहीत. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणे टाळल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेला बळ मिळत आहे.
गणेशोत्सवात अजित पवार सगळीकडे गेले, पण...
उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांनी गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मुंबईतील लालबागच्या राजासह सिद्धीविनायक मंदिरालाही भेट दिली. एवढेच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्या गणपतीचेही दर्शन घेतले, पण त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा मान ठेवत त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाणे टाळले. याची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. वृत्तसंस्था
कदाचित ते विसरले असतील : दीपक केसरकर
या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारणा केली असता शिंदे-पवार यांच्यात कुठल्याही प्रकारचा बेबनाव असल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे नमूद करून ते म्हणाले, ‘‘कदाचित ते मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्यास विसरले असतील. त्यामुळे त्यांनी जाणे टाळले, अशी चर्चा करणे म्हणजे खाजवून खरूज काढण्यासारखे आहे.’’