संग्रहित छायाचित्र
ड्रग्जच्या काळ्या धंद्यातील ललित पाटील (Lalit Patil) हा एक प्यादा आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड (Mastermind) कोण, असा सवाल करीत त्याचा शोध घेण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बुधवारी (दि. १८) केली.
पटोले म्हणाले, ‘‘ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन. नाशिकमध्ये ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर सोलापूरातील एमआयडीसीमध्येही ड्रग्जचा साठा सापडला. महाराष्ट्रात अशाप्रकारे ड्रग्जचे साठे सापडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे. या ड्रग्ज प्रकरणातील ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयात सर्व सोयींचा उपभोग घेत होता हे समोर आले आहे.’’
नाना पटोले म्हणाले की, या ललित पाटीलला पळवून लावण्यात आल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. आज आमचे म्हणणे खरे ठरले असून ललित पाटील स्वतःच सांगत आहे की त्याला पळवून लावण्यात आले होते. या सर्व प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. ड्रग्ज्जच्या काळ्या धंद्याला कोणाचा आशिर्वाद आहे ? ललित पाटीलच्या मागे कोणती शक्ती काम करत आहे? हे उघड झाले पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी यावेळी केली. महाराष्ट्र एक सुसंस्कृत आणि प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या नावलौकिकाला काळिमा फासण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राज्यात मागील काही दिवसांत ड्रग्ज्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ड्रग्ज्जचा धंदा राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय होऊच शकत नाही, असा आरोपही पटोले यांनी केला.