प्रशांत जगतापांच्या अडचणीत वाढ; बाहेरचा म्हणून हडपसरमधून उमेदवारीला विरोध, महाविकास आघाडीला धक्का; हडपसर विकास आघाडी स्थापन

हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रशांत जगताप यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू असतानाच त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यात आले असून हडपसर विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 28 Oct 2024
  • 11:35 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रशांत जगताप यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. जगताप यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू असतानाच त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यात आले असून हडपसर विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. त्यांची उमेदवारी रद्द करून आघाडीतील कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी द्या, अन्यथा हडपसरच्या आघाडीचा उमेदवार करून त्याला निवडून आणू, असा इशारा हडपसर विकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीत हडपसरच्या जागेवरून वाद सुरू होता. या वादाकडे लक्ष न देता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एक एक मतदारसंघ निवडून उमेदवारी जाहीर करून सभा घेण्याचा धडाका लावला होता. हडपसर मतदारसंघातून पक्षाचे शहराध्यक्ष जगताप यांनी जोरदार तयारी सुरू केली होती. तसेच प्रचारदेखील सुरू केला होता. आघाडीतून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. त्याच वेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महादेव बाबर यांना उमेदवारी दिली जाईल, असे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे वादाची ठिणगी पडली होती. परंतु जगताप यांनी ताकद लावून उमेदवारी आणली. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करत असतानाच ते बाहेरचे आहेत, त्यांचे मतदारसंघात घरदेखील नाही, असे सांगत त्यांना महाविकास आघाडीतून आव्हान उभे करण्यात आले आहे.

...अन्यथा २००२ ची पुनरावृत्ती : योगेश ससाणे

मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार लादण्यात आला आहे. त्यामुळे जगताप यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला आहे. २००२ मध्ये हडपसर विकास आघाडीचा प्रयोग महापालिका निवडणुकीवेळी करण्यात आला होता. त्याची पुनरावृत्ती होईल, याची वरिष्ठ नेत्यांनी नोंद घ्यावी. राष्ट्रवादीमधून योगेश ससाणे, प्रवीण तुपे, बंडू गायकवाड, महादेव बाबर, बाळासाहेब शिवरकर, प्रशांत म्हस्के आदी इच्छुक उमेदवार आहेत. यापैकी कोणत्याही एका उमेदवाराला उमेदवारी दिली तरी आम्ही एकत्र येत त्यांचा प्रचार करून तसेच त्या उमेदवाराला निवडून आणू. मंगळवारी आम्ही सर्व इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. जर याची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतली नाही तर हडपसर विकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीला सामोरा जाणार आहे. अजित पवार गटासह आणखी २५ माजी नगरसेवकांसह दोन माजी आमदारही हडपसर विकास आघाडीत येणार आहेत, असे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक योगेस ससाणे यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.

हे आहेत हडपसर विकास आघाडीचे शिलेदार

हडपसर विकास आघाडीने जगताप यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे. या आघाडीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, योगेश ससाणे यांच्यासह शरद पवार, अजित पवार गटाचे नेते यांच्यासह १४ नगरसेवकांचा समावेश आहे. या आघाडीने खासदार अमोल कोल्हे यांची मुंबईत भेट घेत जगताप यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी केली आहे. यावेळी दिलीप तुपे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, राजाभाऊ लोणकर, योगेश ससाणे, नीलेश मगर, प्रवीण तुपे, आनंद आलकुंटे, प्रशांत म्हस्के, प्राची आल्हाट, संगीता ठोसर, समीर तुपे यांनी कोल्हे यांची भेट घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली.

मी हडपसरचा भूमिपुत्र आहे. तीन वेळा महापालिकेला मी या मतदारसंघातील प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. राजकारण आणि पक्षनिष्ठा वेगवेगळी गोष्ट असते. २५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षात काही घडामोडी घडल्या तेव्हापासून एकनिष्ठ राहिल्यामुळे जनतेचा असलेला संपर्क, केलेली कामे यावरून पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता निर्णय झालेला आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागते. हा प्रकार केवळ राजकारण करण्यासाठी केला जात आहे. या गोष्टीला महत्त्व  न देता हडपसरची जनता मला कौल देणार, याबाबत माझ्या मनात शंका नाही.

- प्रशांत जगताप, अधिकृत उमेदवार, शरदचंद्र पवार पक्ष, हडपसर विधानसभा मतदारसंघ.

Share this story

Latest