पुण्यात शरद पवार,अजित पवारांच्या मनोमिलनासाठी झळकले फ्लेक्स
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकर्त्यांना अजित पवार व शरद पवार पुन्हा एकत्र येतील याची आस लागून आहे. काका-पुतण्या पुन्हा एकत्र यावे यासाठी कार्यकर्ते अनेक वेळा अनेक प्रकारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये कुणी रक्ताने पत्र लिहणार तर कुणी फ्लेक्स लावत मनधारणी करणार. दरम्यान असेच एक फ्लेक्स पुण्यातील मांजरी गावात ''लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस'' अशा आशयाचे फ्लेक्स झळकले. याच फ्लेक्सची सर्वत्र चर्चा झाल्याचे बघायला मिळाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त शुक्रवारी एकत्र येणार होते. त्यावेळी मांजरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय घुले यांनी एक फ्लेक्स लावले त्यामध्ये ''लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस'' पुण्यातील मांजरीत लागलेल्या या फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरु झाली.
राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने हे फ्लेक्स लावते मात्र या कार्यक्रमाला अजित पवार यांनी दांडी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवार यांना बगल दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. अजित पवार यांनी दौंड येथे कार्यक्रम असल्याचे कारण देत वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या या कार्यक्रमात जाण्यास टाळाटाळ केली. मात्र या कार्यक्रमास अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावल्याचे बघायला मिळाले.