Ajit Pawar : ...तरी अजित पवारांचे राजकीय आजापरपण कायम

अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Thu, 5 Oct 2023
  • 03:46 pm
Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण नाशिक, रायगड व सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून अजित पवार यांचे राजकीय आजारपण अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.

 अजित पवार यांच्या गटाला पुण्यासह अन्य काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले असले तरी अद्याप नाशिक, रायगड व सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरील पेच सुटला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही जिल्ह्यांचे पालकत्व आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत. पण अजित पवार यांना हे तिन्ही जिल्हे आपल्याकडे हवे आहेत. विशेषतः नाशिकसाठी छगन भुजबळ अडून बसल्यामुळे त्यांचा त्यासाठी मोठा आग्रह आहे. यावरून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात मतभेद असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आता यावर सत्ताधारी पक्ष कोणता तोडगा काढतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी (दि. ३) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणिउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीतील बैठकीलाही ते गेले नव्हते.  तत्पूर्वी, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या बैठकीलाही दांडी मारली होती. त्यामुळे पालकमंत्री पद आणि मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचा सहभाग या मुद्द्यावरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अजित पवारांच्या नाराजीचे सर्वात मोठे उदाहरण गणेशोत्सवात दिसून आले. पवार गणपतीच्या दर्शनासाठी मलबार हिल स्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले. पण तेथून जवळच असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाणे त्यांनी टाळले. मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नसल्याचे ते नाराज असल्याची चर्चा तेव्हा सुरू झाली होती.

राष्ट्रवादीला हव्या असणाऱ्या जिल्ह्यांत पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या. अजित पवार यांना स्वतःला पुण्याचे पालकमंत्रीपद हवे होते. पण ते ही मिळत नव्हते. यामुळेही त्यांची नाराजी वाढली होती.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्येही अजित पवारांच्या गटाला तीन जागा मिळू शकतात. पण अजित पवारांनी चार जागांवर जोर देत होते. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पवार, शिंदे आणि फडणवीस यांची काही दिवसांपूर्वीच रात्री बैठक झाली होती. पण त्यात कोणताही तोडगा निघाला नव्हता. सध्या पुण्याचे पालकमंत्रीपद देऊन अजित पवार यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण ही नाराजी दूर झाली किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेषतः पुण्याचे पालकमंत्रीपद हिरावून घेतल्यामुळे भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील हे नाराज होण्याची भीतीही या प्रकरणी व्यक्त केली जात आहे. असे झाले तर भाजपपुढे आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल.

 अजित पवार महत्त्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहत असल्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना राजकीय आजारपण जडल्याची टीका केली होती. अजित पवारांना राजकीय आजार झाल्याची शक्यता आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला होत असलेल्या दिरंगाईमुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याविषयी सूचक विधान केले होते. राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार येऊन केवळ तीन महिने झालेत. त्यातच एक गट नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाराज गटाने फडणवीस यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडल्याचे मी ऐकले. या सरकारचा हनिमून परियड अजून संपला नसताना आताच त्यांच्यात खटके उडत आहेत, असे त्या म्हणाल्या होत्या.

या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आजारपणामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याचा दावा केला. तसेच यासंबंधी कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest