संग्रहित छायाचित्र
पुण्याचे पालकमंत्रिपद काढून घेतल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी आतापर्यंत यावर काही भाष्यही केले नव्हते. मात्र, आता मौन सोडले असून पालकमंत्रिपद गेले म्हणून नाराज होण्याचे कोणतेही कारण नाही. लोकसभेला महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून आणण्याच्या मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड असल्याचे सांगितले.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री होण्यासाठी अजित पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्धही रंगले होते. त्यानंतर त्यांचे पालकमंत्रिपद काढून घेऊन अजित पवारांकडे देण्यात आले. या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, पुण्याचे पालकमंत्रिपद गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणीही नाराज होण्याचे कारण नाही. एका मोठ्या कामासाठी केलेली ही एक छोटी तडजोड आहे. बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्याची आता संधी आहे. यावेळी जिंकलो नाही तर पुन्हा कधीच नाही.
पाटील म्हणाले, बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करायचा असेल तर मतभेद बाजूला ठेवून काम करावे लागेल. पालकमंत्रिपद सोडण्यासाठी मी केलेली तडजोड ही राज्यात ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्यासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठीची आहे. वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. पालकमंत्री नसलो तरी व्हीआयटी सर्किट हाऊस मधील माझी दोन्ही कार्यालये सुरूच राहणार आहेत. मी पूर्वीसारखाच पुण्यात काम करणार आहे. सर्वांना भेटणार आहे. पूर्वीसारखाच निधी आणणार आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता कामे करणे योग्य राहणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याचे गणित सांगताना पाटील म्हणाले, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता देशमुख-ठाकरे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्या बाजूला होते. आज ते आपल्यासोबत आहेत. पुरंदरचे नेते बाबा जाधवरावही आपल्या समर्थकांसह इथे आहेत. अनेक गोष्टी भाजपच्या बाजूने आहेत. माझा फोटो छोटा, तुमचा फोटो मोठा यावर वाद घालण्यापेक्षा द्वेष, मतभेद संपवून कामाला लागा, रात्रीच्या अंधारात विरोधकांना भेटणे बंद करा.
सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवार गटाचाही उमेदवार?
बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा उमेदवार असेल तर त्यालाही विजयी केले जाईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, बारामतीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार असेल. तो कोणत्या पक्षाचा असेल हे वरिष्ठ नेते ठरवतील. अजित पवार गटाचा उमेदवार असला तरी त्याला महायुतीची ५१ टक्के मते मिळतील. त्यामुळे उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. बारामती जिंकण्याचा निर्धार असून कार्यकर्ते सहाशे घरांना भेटी देतील. अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नच राहील या शरद पवार यांच्या विधानाबाबबत ते म्हणाले की, अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही शरद पवार यांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही.