'एकतर मी जिवंत राहीन, किंवा ते'; मनसे नेत्यांवरील कारवाईसाठी अमोल मिटकरी यांचे आंदोलन

मुंबईत बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे धमकी देत आहेत. येथे कर्णबाळ दुनबळे धमकी देतात, यांच्या काय बापाचं राज्य आहे का? त्यामुळे आता काहीही झालं तरी चालेल, एकतर आता मी जिवंत राहीन, किंवा ते जिवंत राहतील, असा आक्रमक पवित्रा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 2 Aug 2024
  • 10:49 am
Maharashtra Navnirman Sena , political news, amol mitkari, MLA of Ajit Pawar's NCP, aggressive stance, Amol Mitkari's agitation for action against MNS leaders

संग्रहित छायाचित्र

अकोला: मुंबईत बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे धमकी देत आहेत. येथे कर्णबाळ दुनबळे धमकी देतात, यांच्या काय बापाचं राज्य आहे का? त्यामुळे आता काहीही झालं तरी चालेल, एकतर आता मी जिवंत राहीन, किंवा ते जिवंत राहतील, असा आक्रमक पवित्रा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी अद्यापही कोणावर कारवाई केलेली नाही.

अमोल मिटकरी अकोला येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनाला बसले असून त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोननंतर अकोला पोलीस आरोपींना पकडण्यास टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी मनसेच्या काही नेत्यांवर टीकाही केली. ते म्हणाले, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर पोलीस मला संरक्षण देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत माझा परिवार माझ्या बरोबर खंभीरपणे उभा आहे. याचा मला अभिमान आहे. अजित पवार हे खमके नेते आहेत. माझ्या नेत्यावर कुणी गल्लीतला गुंडा बोलत असेल, तर त्याच्या थोबाडीत मारण्याची ताकद आमच्यात आहे. 

दुनबळे-पोलिसांचे संबंध काय? 

मनसेचे नेते कर्णबाळ दुनबळे आणि अकोला पोलिसांचे काय संबंध आहेत, हे पुढे आलं पाहिजे. अकोल्यातल्या एका हॉटेलमध्ये काही पोलिसांनी त्यांची भेट घेतली आहे. ते मोकाट का फिरत आहेत. माझ्यासारख्या आमदारावर हल्ला होतो आणि तरीही आरोपींना तीन दिवस अटक का होत नाही?, असा प्रश्नही अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. ज्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला, त्यांचे आणि माझे यापूर्वी चांगले संबंध होते. मात्र, कर्णबाळ दुनबळे अकोल्यात आले आणि त्यांनी अकोल्याचे वातावरण खराब केले. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. पोलिसांनी त्यांना अभय का दिलं आहे, हे पुढे आलं पाहिजे, असेही मिटकरी म्हणाले. तसेच मी आज न्याय मागण्यासाठी इथे आंदोलनाला बसलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

Share this story

Latest