संग्रहित छायाचित्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) २२ जागांची मागणी केल्यानंतर ‘‘कुणी काहीही मागितले नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ,’’ असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी लोकसभा जागावाटपाच्या मुद्द्यावर स्पष्टपणे बोलणे टाळले.
राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील घटक पक्षांत या ना त्या मुद्दयावरून सध्या खटके उडत आहेत. त्यात आता लोकसभेचे जागावाटप या कळीच्या मुद्दयाची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार राहुल शेवाळे यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ पैकी २२ जागांची मागणी केली होती. बुधवारी (दि. १८) पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘‘लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या प्रश्नावर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि जागावाटपाचा निर्णय घेऊ. अद्याप कुणीही काहीही मागणी केलेली नाही. ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ.’’
शिंदे गटाचे प्रवक्ते शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी २२ जागांची मागणी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली होती. ‘‘अजून जागावाटपाची चर्चा झाली नाही. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र चर्चा करून या विषयावर निर्णय घेतील,’’ असे सांगत त्यांनीही जागावाटपाच्या मुद्दयावर अधिक बोलणे टाळले होते. हाच कित्ता पुण्यात फडणवीसांनीही गिरवला. ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली.
या प्रकरणावर गृहमंत्रिपद सांभाळणारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘आता ललित पाटील हातात आला आहे, त्यामुळे अनेकांची तोंडं बंद होणार आहेत. आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असे काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली.’’ वृत्तसंस्था
शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर दावा केला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी शिंदे गटाचे १३ खासदार आहेत, त्या सर्व जागा या पक्षाला सोडण्यास भाजप तयार असल्याचे सांगितले जात आहे. पण सत्तेत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंड करून अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे ४८ जागांचे वाटप कसे करायचे, हा मोठा प्रश्न भाजपसमोर येत्या काळात निर्माण होणार आहे. शिंदे गटाची २२ जागांची मागणी विचारात घेता ४८ पैकी २६ जागा उरतात. सत्तेत सहभागी उर्वरित भाजप आणि अजित पवार गट यांच्यात इतक्या कमी जागांचे वाटप शक्य नाही. त्यामुळे या तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये जागावाटपाचा वाद चिघळणार, हे निश्चित आहे. भाजपने राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तिन्ही पक्षांनी आपसातील वाद मागे ठेवून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.