Bachchu Kadu : शिंदेंना हटवल्यास गंभीर परिणाम; आमदार बच्चू कडू यांचा भाजपला गर्भित इशारा

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी एका आठवड्याच्या आत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने अचानक वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यास गंभीर परिणाम होतील

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 23 Sep 2023
  • 02:45 pm
Bachchu Kadu

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे वेगवान घडामोडी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी एका आठवड्याच्या आत घेण्याचे निर्देश दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाने अचानक वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यास गंभीर परिणाम होतील,’’ असा इशारा सत्तेतील सहभागी घटक पक्षाने भाजपला शुक्रवारी (दि. २२) दिला.  

बंडखोर आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी झाल्यास मूळ शिवसेनेतून सर्वप्रथम बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील, अशी चर्चा सर्वत्र जोरात आहे. सत्तेत सहभागी असलेल्या पक्षातील मोठ्या नेत्यांनी तसेच आमदारांनीदेखील खासगीत ही भीती असल्याचे मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या प्रकरणाची तातडीने सुनावणी घ्यावी लागेल.  या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व शक्यतांचा खेळ सुरू असतानाच  बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील. लोकांचे प्लॅन वाढले तर भाजपचे कोणतेच प्लॅन कामी येणार नाहीत,’’ असा गर्भित इशारा त्यांनी दिला. दुसरीकडे “एकनाथ शिंदे २०२४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील का, याबाबत आता सांगता येणार नाही, पण तेच मुख्यमंत्री राहावेत, असं माझं मत आहे,’’ असा सावध पवित्रा मुख्यमंत्र्यांच्या गटातील नेते संजय शिरसाट यांनी घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारलं तेव्हा सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धुसफूस असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण तिन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी एकत्रितपणे बैठका घेत योग्य समन्वय साधला होता. त्यानंतर आता शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी घडामोडी वाढल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे.

 ‘‘आरक्षण विषय हा राजकीय लोकांनी केलेली जातीय व्यवस्था आहे. कारण विकासावर मते घेऊ शकले नाहीत. आता निवडणुकीत समाजात आरक्षणावर मते मागितली जाणार. जातीचे मुद्दे घेऊन मते मागणार असा टोला त्यांनी लगावला आहे. मराठा आरक्षणानंतर धनगर व मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी ते समाज आक्रमक झाले आहेत. सरकारने एकदा आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे,’’ असा मुद्दा बच्चू कडू यांनी मांडला. एकीकडे लोक आरक्षण मागत आहेत तर दुसरीकडे कंत्राटी नोकरभरती केली जातेय. अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यांकन झाले का कधी? तो किती काम करतोय, पगाराप्रमाणे तो काम करतोय का? मग कंत्राटी कामगारांकडून अपेक्षा काय ठेवता? स्वच्छ प्रशासन लावून कंत्राटी पदे भरायला काहीच हरकत नाही, अशी सूचनाही बच्चू कडू यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest