मराठा आरक्षण आंदोलनावर चंद्रकांत पाटलांचे मौन, माध्यमांकडे फिरवली पाठ
जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हवेतगोळीबार करण्यात आला. मात्र, याबाबत पुण्यात चंद्रकात पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समनव्यक समितीचे अध्यक्ष आहेत. आज ते पुण्यात असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राज्यात मराठा आरक्षण आंदोलन चिघळले असताना चंद्रकांत पाटील यांनी मौन बाळगले. मराठा मोर्चावर प्रश्न विचारताच मंञी चंद्रकांत पाटलांनी माध्यमांकडे पाठ फिरवली. समितीचे अध्यक्ष असताना चंद्रकांत पाटलांनी बोलण्यास नकार दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, २९ ऑगस्टपासून मराठा मार्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर आंदोलकांनी दगडफेक केली गेली. यात अनेक जण जखमी झाले आहेत.