Rohit Pawar : अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेलिंग; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 23 Sep 2023
  • 05:22 pm
Rohit Pawar

रोहित पवार यांचा गंभीर आरोप

आणखी एक आमदार, खासदार फुटला

मुंबई
अजित पवार गटाकडून आमदारांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) केला.

शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात सामील झाल्याची चर्चा आहे. त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. या विषयावर प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी हा गंभीर आरोप केला आहे. ‘‘सही कर नाही तर अमूक अमूक काम होणार नाही,’’ अशी धमकीही दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक खासदार आणि एक आमदार अजित पवार गटात खरच गेला का? हे पाहावे लागेल. आमदारांचे एखादे महत्त्वाचे काम त्याने प्रतिज्ञापत्र दिल्याशिवाय केले जात नाही, असाही आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाकडे जास्त संख्याबळ याची चर्चा रंगली आहे. मात्र, आता निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच शरद पवार गटातील आणखी एका खासदाराने आणि आमदाराने अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

न्यायालयात शरद पवार गटाचाच विजय होणार

शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी करत अजित पवार गटाने विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. त्यावरही आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केले आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘‘विधानसभा अध्यक्ष दिल्लीला कायदेशीर सल्ला घेण्यासाठी गेले होते. तिथूनच त्यांनी अजित पवार गटाला फोन केला असेल आणि त्यानंतर हे करण्यात आले असेल. त्यांची ती रणनीती असेल.’’ आम्हीदेखील या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार आहोत. हा लढा कोर्टात जाईल आणि विजय आमचा होईल, असा दावादेखील रोहित पवार यांनी केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest