ऑगस्ट महिना कोरडा, परिस्थितीचा दुष्काळाकडे इशारा – सुप्रिया सुळे
गेल्या काही वर्षांत प्रथमच संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. काही धरणांनी तर तळ गाठला आहे. हि सगळी परिस्थिती दुष्काळाकडे इशारा करीत आहे. त्यामुळे राज्य सरकारने दुष्काळ जाहिर कऱण्याबाबत गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले की, ऑगस्टमध्ये आपल्या राज्यात नेहमीच्या तुलनेत केवळ ४० टक्के पाऊस पडला. महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट अखेरीस ३२ ते ४४ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या ८३.६० टक्क्यावरून ६४.३७ टक्क्यावर आला आहे. शिवाय, खरीप पिकांसह पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये २.७२ लाख हेक्टरने घट झाली आहे आणि कडधान्यांसह लागवड केलेल्या क्षेत्रात १५ टक्के घट झाली आहे. बदललेल्या पावसाचे स्वरूप आणि खरिपाच्या पेरणीला उशीर झाल्याने यंदाच्या कापणीवर नकारात्मक परिणाम होईल. अन्नधान्य उत्पादन धोक्यात आहे आणि १० ते १५ टक्के कमी होऊ शकते.
गेल्या काही वर्षांत प्रथमच संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. याचा शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. धरणांतील पाणीसाठा अतिशय जपून वापरण्याची गरज आहे. काही धरणांनी तर तळ गाठला आहे. हि सगळी परिस्थिती दुष्काळाकडे इशारा करीत आहे. हळूहळू हि परिस्थिती आणखी भीषण होईल असे दिसते. हे लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा छावण्यांच्या माध्यमातून चारा पुरविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी मागणी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केली आहे.