ससून रुग्णालयातील डॉक्टरांचीही चौकशी करा - अंबादास दानवे
पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याने ससून रुग्णालयातून (Sassoon hospital) पलायन केल्यानंतर पोलिसांना निलंबित करण्यात आले, तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टरांचीही (Pune Police) चौकशी करून ते दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.
आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. (Pune Crime News) ससून रुग्णालयात कैदी आठ महिने कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी राहतात असा सवाल करत दानवे यांनी त्यांना जाणीवपूर्वक आसरा दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांप्रमाणे डॉक्टर ही या प्रकरणात दोषी आहेत. येथे डॉक्टर औषधोपचार करतात की कैद्यांचं पालन पोषण करतात असा सवाल दानवे यांनी करत संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, अपुरा औषध पुरवठा आदी बाबतीत बैठक घेऊन आढावा घेतला, तसेच याबाबत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. ससून रुग्णालयात माता मृत्यूंचे प्रमाण वाढले असून शून्य रुपयांची औषधी खरेदी झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळातून एकही रुपया औषधं खरेदीसाठी देण्यात आला नाही. ससून रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन नाही,राज्य सरकार खोट बोलत आहे. डॉक्टर रुग्णांना औषध लिहून देतात. एकप्रकारे अतिशय भयावह स्थिती आहे, येथील परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे दानवे यांनी म्हटले.
तसेच या भेटीनंतर दानवे यांनी साखर आयुक्तालय येथे ऊसाला योग्य व किफायतशीर दर मिळावा, ऊस मोजमापासाठी डिजिटल काटे उपलब्ध व्हावे, वाहतूक दर, ऊस तोड कामगारांची जबाबदारी कारखानदारांनी घ्यावी आदी मागण्यांबाबत आज शिवसेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष नितीन बानगुडे पाटील व पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासह साखर आयुक्त यांची त्यांच्या कार्यालयात आज बैठक घेऊन त्यांना निवेदन दिले.
पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधं, सोयी सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व ओपीडीमध्ये भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा मेट्रो प्रवास
आज पुणे दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे मेट्रो प्राधिकरण कार्यालयाला भेट देऊन पुणे मेट्रोच्या कामाची माहिती घेऊन आढावा बैठक घेतली. पुणे मेट्रो मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार प्राधान्याने मिळाला पाहिजे. मेट्रो स्थानकांची नाव ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती यांची जपणूक करून मेट्रो मंडळाने द्यावी आदी सूचना यावेळी केल्या. सिव्हिल कोर्ट, शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड मार्गावर आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे मेट्रोने प्रवास केला. १३० फूट खाली भुयारी मेट्रो स्थानकाचे बांधकाम व एकूणच कामाची माहिती घेऊन मेट्रोच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.