दादांची नजर आता 'गृहनिर्माणा'वर
पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीवर दावा ठोकत भाजप-सेना सरकारमध्ये (BJP-Sena Govt) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अर्थखात्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्रिपद पटकावले आणि कालांतराने पुण्याचे पालकमंत्रिपदही स्वतःकडे घेतले. आता लवकरच तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यावेळी अजित पवार गटाला गृहनिर्माण खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. गावोगावी पुढाऱ्यांना आणि स्थानिक प्रतिनिधींना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चा झाली. दरम्यान या चर्चेदरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावरदेखील चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास राज्याचा तिसरा टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार हा पूर्ण होईल. या विस्तारामध्ये भाजपला ७, शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला ३ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. यातही गृहनिर्माण खात्यासाठी अजित पवार आग्रही असल्याचे दिसून आले आहे. भलेही संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला जास्त मंत्रिपदे दिली जाणार असतील, मात्र अजित पवार गटाच्या वाट्याला येणाऱ्या ३ मंत्रिपदासाठी वजनदार खात्यांचा कारभार सोपवला जाणार असल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा प्रलंबित राहिला आहे. पण अजित पवारांनी सत्तेत सहभाग घेतला आणि वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा हा मार्गी लागला, पण या दुसऱ्या टप्प्याच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील अनेक आमदार घोड्यावर बसून होते. पण ती मंत्रिपदे राष्ट्रवादीकडे गेली आहेत. त्यामुळे शिवसेनेतून नाराजीचे सूर उमटू लागले, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यातील विस्तार झाल्यास शिंदे गटातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सरकारमध्ये सहभागी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी दिवाळी गोड !
मंत्रिपदाबरोबरच महामंडळांचे वाटप करून सर्व कार्यकर्ते, नेत्यांची दिवाळी गोड करण्यावरही चर्चा झाल्याची कुजबूज आहे. महायुतीच्या सरकारचे अद्याप महामंडळाचे वाटप बाकी आहे. म्हणून या विस्तारामध्ये महामंडळांचे वाटप होण्याची शक्यता आहे. विशेषतः महत्त्वाच्या खात्यावर नजर ठेवून असलेल्या पण संबंधित खाती राष्ट्रवादीकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महामंडळांचे वाटप करताना प्राधान्य देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तब्बल १३ दिवसांनी खातेवाटप करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थखाते देण्यात आले आणि पुन्हा शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले. तर यावेळच्या विस्तारामध्ये अजित पवार गटाकडे गृहनिर्माण खाते दिले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या आमदारांकडून नाराजी व्यक्त केली जाणार का, हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल.