मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाट; मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ल्यानंतर गोळीबारात ६ ठार

गुवाहाटी: मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. हा तणाव सध्या कमी होण्याची चिन्हे देखील दिसत नाहीत. बिष्णुपूरमध्ये आज भीषण रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या हिंसाचारात व गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sun, 8 Sep 2024
  • 03:15 pm
PuneMirror

राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद

गुवाहाटी: मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. हा तणाव सध्या कमी होण्याची चिन्हे देखील दिसत नाहीत. बिष्णुपूरमध्ये आज भीषण रॉकेट हल्ल्यानंतर झालेल्या हिंसाचारात व गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, एका व्यक्तीला झोपेत असताना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या गोळीबारात पाचजणांना ठार करण्यात आले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरचे माजी मुख्यमंत्री मैरेंबम कोइरेंग सिंह यांच्या मोईरांग शहरातील घरावर दुपारी साडेतीनच्या सुमारास रॉकेट डागण्यात आले. हे रॉकेट घराच्या आवारात आणि घरापासून काही अंतरावर कोसळले, ज्यात धार्मिक विधींची तयारी करत असलेल्या ७२ वर्षीय आर.के.राबेई सिंह यांचा मृत्यू झाला.

१३ वर्षीय मुलीसह माजी मुख्यमंत्र्यांचे पाच नातेवाईक जखमी झाले. सिंह १९६३ ते १९६९ या तीन वेगवेगळ्या टर्ममध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री होते. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले. सिंह यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर परिसरात हिंसाचार सुरू झाला आहे. शुक्रवारी (६ सप्टेंबर) पहाटे चार वाजता जिल्ह्यातील त्रोंगलोबी गावातील दोन इमारतींवर अशाच शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अतिरेक्यांनी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर एकट्या राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याची गोळ्या झाडून हत्या केली. अधिकारी म्हणाले की, हत्येनंतर, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये लढाऊ समुदायांच्या सशस्त्र लोकांमध्ये जोरदार गोळीबार झाला, ज्यामध्ये तीन अतिरेक्यांसह चार सशस्त्र नागरिक ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात मृत्युमुखी पडलेले नागरिक हे कुकी आणि मेईतेई या दोन्ही समुदायाचे होते. मणिपूरमधील हिंसाचाराच्या ताज्या घटनांनंतर गेल्या पाच दिवसांत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिष्णुपूरमध्ये शुक्रवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. याशिवाय २ मणिपूर रायफल्स आणि ७ मणिपूर रायफल्सच्या मुख्यालयातून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हिंसाचारात प्रथमच रॉकेट, ड्रोनचा वापर  

गेल्या १७ महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात पहिल्यांदा रॉकेट आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. कुकी अतिरेक्यांनी लांब पल्ल्याचे रॉकेटही डागल्याचे पोलिसांनी सांगितले. या रॉकेटची लांबी सुमारे चार फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवारी राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मणिपूर गेल्या वर्षी ३ मे पासून जातीय हिंसाचारात होरपळत आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, दारुगोळा एका लांब पाईपमध्ये भरून रॉकेट लाँचरच्या साहाय्याने डागण्यात आले.

मणिपूरमध्ये अलीकडे ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने पोलीस, लष्कर आणि निमलष्करी दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती आता अहवाल तयार करत असून १३ सप्टेंबरपर्यंत हा अहवाल सादर केला जाणार आहे. मणिपूरचे पोलीस महासंचालक राजीव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या अतिरेक्यांनी तैनात केलेल्या ड्रोनची सखोल तपासणी आणि अभ्यास करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही स्फोटके गॅल्व्हेनाइज्ड लोखंडी पाईपमध्ये भरण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर स्फोटके असलेले जीआय पाईप देशी बनावटीच्या रॉकेट लाँचरमध्ये बसवून एकाच वेळी डागण्यात आले. सध्या तरी डोंगरावरील नेमकी जागा सांगता येत नाही, जिथून गोळीबार करण्यात आला, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest