कुत्र्याने नाकारले, कार्यकर्त्याला दिले?, बिस्किटाचा 'तो' व्हीडीओ व्हायरल
नवी दिल्ली : हल्ली सोशल मीडियामुळे जग फारच जवळ आले आहे. देशाच्या काना-कोपऱ्यात कोणता नेता काय करतोय, कोण काय बोलतो आहे हे क्षणात सगळ्यांना समजते आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत न्याय यात्रेतील (Bharat Nyay Yatra) एक व्हीडीओ व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी कुत्र्यासमोर असलेले बिस्किट उचलून काँग्रेस नेत्याला दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने (BJP) केला आहे.
'भारत न्याय यात्रे' दरम्यान राहुल गांधी श्वानाच्या पिल्लाला बिस्किटे खाऊ घालतानाच्या एका व्हायरल व्हीडीओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्हीडीओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यांशी केली होती आणि इथे राहुल गांधी कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालत आहेत आणि जेव्हा कुत्र्याने खाल्ली नाही, तेव्हा त्यांनी ते बिस्किट कार्यकर्त्याला दिले. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे वागवतात, तो पक्ष गायब होणे स्वाभाविक आहे, अशी टीका केली आहे.
भाजप नेत्या पल्लवी सीटी यांनीही या व्हीडीओवरून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आता राजकुमाराने कुत्र्याने नाकारलेली बिस्किटे पक्षाच्या एका कार्यकर्त्याला दिली. पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक आणि मतदारांची ते किती किंमत करतात पाहा.' पल्लवी सीटी यांनी यावेळी जुनी आठवणही सांगितली जेव्हा राहुल गांधींनी हिमंता बिस्वा सरमा यांना त्याच प्लेटमध्ये बिस्किटे दिली होती ज्यामध्ये त्यांचा पाळीव कुत्रा खात होता.
पल्लवी यांच्या पोस्टला उत्तर देताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, 'केवळ राहुल गांधीच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्किटे खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढत आहे. १४ जानेवारी रोजी मणिपूरची राजधानी इंफाळ येथून हा प्रवास सुरू झाला. सध्या ही यात्रा झारखंडमध्ये असून येत्या काही दिवसांत छत्तीसगडला जाणार आहे. भाजप नेत्यांनी शेअर केलेला व्हीडीओ भारत न्याय यात्रेतील असल्याचे बोलले जात आहे.
कुत्र्याने भाजपचे काय नुकसान केले आहे?
दरम्यान, अधिकृत भारत न्याय यात्रा हँडलने शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये बिस्किट क्लिपचा समावेश नव्हता. भाजपच्या या टीकेवर काँग्रेसकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र खुद्द राहुल गांधी यांनी याबाबत खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले, 'यात काय मुद्दा आहे? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणले, तेव्हा तो घाबरला होता. तो थरथर कापत होता. त्याने काही खाल्ले नव्हते म्हणून मी त्याला बिस्किट खायला दिले, पण, त्याने ते बिस्किट खाल्ले नाही. म्हणून त्या व्यक्तीला दिले आणि सांगितले, भाऊ, तुम्हीच त्याला खायला द्या. नंतर कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले. यावर भाजप नेत्यांना काय अडचण आहे? कुत्र्याने त्यांचे काय नुकसान केले आहे?