अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या क्वाड शिखर परिषदेला हजर राहण्याच्या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. डेलावेअर येथे शिखर परिषद संपल्यानंतरच्या कार्यक्रमावेळी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन शनिवारी चक्क पंतप्रधान मोदींचे नाव विसरले. यावेळी मंचावर मोदी यांच्यासमवेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हेही उपस्थित होते.
आपले भाषण संपल्यावर बायडेन मंचावर आमंत्रित करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे नाव घेणार होते. मात्र यावेळी ते त्यांचे नाव विसरले. सुमारे १५ सेकंद ते नाव आठवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आठवत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर बायडेन यांनी जवळ उभ्या असलेल्या अधिकाऱ्याला आवाज दिला आणि विचारले की आता कोणाला बोलवायचे आहे? यानंतर अधिकाऱ्याने मोदींकडे बोट दाखवले. त्यावर मोदी बायडेन यांच्याकडे गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन केले. विस्मरणाचा विकार असलेल्या बायडेन यांनी नाव विसरण्याची ही पहिलीच वेळ नाही. जुलैमधील नाटोच्या बैठकीत झेलेन्स्की यांना पुतिन नावाने बोलावले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा डोनाल्ड ट्रम्प असा उल्लेख केला होता.
या दौऱ्यात मोदी बायडेन यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. दरम्यान, अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी मोदी आणि बराक ओबामा यांच्या भेटीचा एक जुना किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले,
२०१४ मध्ये मोदी आणि बराक ओबामा यांच्यातील चर्चा संपल्यावर ओबामा आपल्या लिमोझिनमधून मार्टिन ल्यूथर किंग मेमोरियलकडे रवाना झाले होते. त्यावेळी मी गाडीमध्ये अनुवादक म्हणून उपस्थित होतो. यावेळी ओबामा यांनी मोदींना त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारले होते. मोदी म्हणाले, मी जे तुम्हाला सांगेन त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुमच्या गाडीमधील जागा जितकी मोठी आहे, तेवढ्याच आकाराच्या घरात माझी आई राहते. मोदी यांचे शब्द ऐकून ओबामा यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. या संभाषणानंतर ओबामा आणि मोदी यांच्यामध्ये जे संबंध निर्माण झाले ते प्रामाणिकपणावर आधारित होते.