कर्नाटकात अंगणवाडी नोकरीसाठी उर्दूची सक्ती; मुस्लीम लांगूलचालनाचा भाजपचा आरोप

बंगळुरू: अंगणवाडी शिक्षकपदासाठीच्या भरतीसाठी इतर काही नियमित निकषांप्रमाणेच उर्दू सक्तीची करण्याचा निकष समाविष्ट करण्याबाबत नुकताच कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जीआरदेखील काढण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला कर्नाटकमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 25 Sep 2024
  • 12:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सरकारच्या निर्णयाने वातावरण तापले

बंगळुरू: अंगणवाडी शिक्षकपदासाठीच्या भरतीसाठी इतर काही नियमित निकषांप्रमाणेच उर्दू सक्तीची करण्याचा निकष समाविष्ट करण्याबाबत नुकताच कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जीआरदेखील काढण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला कर्नाटकमधील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. मुस्लीम समुदायाचं लांगूलचालन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारचा हा जीआर चर्चेचा विषय ठरला आहे.

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारने या संदर्भात जारी केलेल्या जीआरवर भाजपाकडून टीका केली जात आहे. राज्यात अंगणवाडी शिक्षिकांची भरती करण्यासाठी काँग्रेस सरकारने जीआर काढला आहे. कर्नाटकच्या चिकमंगळुरू व मुदीगरे जिल्ह्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी हा जीआर काढण्यात आला आहे. मात्र, या जीआरमधील एका निकषामुळे त्यावर टीका होत आहे.

भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना उर्दू भाषा येणे सक्तीचे असल्याचे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. या जीआरवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. कर्नाटकमधील भाजपचे खासदार नलिनकुमार कटील यांनी या संदर्भात केलेल्या एक्स पोस्टमध्ये याबाबत भाष्य केले आहे. अंगणवाडी शिक्षकपदासाठी उर्दू भाषा यायला हवी, अशी सक्ती करणारी काँग्रेस सरकारची घोषणा निषेधार्ह आहे. मुस्लीम समुदायाचं छुपं लांगूलचालन करण्याचा हा प्रयत्न आहे. अंगणवाडी शिक्षक भरतीमध्ये फक्त त्यांनाच नोकऱ्या मिळाव्यात यासाठीचा हा प्रयत्न म्हणजे काँग्रेसच्या ओंगळवाण्या राजकारणाची परिसीमा आहे,  असे कटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.  “कर्नाटक सरकार कन्नड भाषिक भागामध्ये उर्दू भाषेची सक्ती करत आहे. कन्नड भाषेपेक्षा उर्दूला प्राधान्य का दिले जात आहे? याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्री लक्ष्मी हेबबाळकर यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी पोस्ट कर्नाटक भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केली आहे. 

शिक्षण विभागाचे उपसंचालकांना पत्र!

दरम्यान, या जीआरबाबत कर्नाटकच्या शिक्षण विभागाने उपसंचालकांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये उर्दू भाषिक लोकसंख्येच्या प्रमाणाबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. भरती चालू असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या समुदायांचे लोक राहात असून त्यात मुस्लीम समुदायाचे प्रमाण ३१.९४ टक्के इतके आहे. सरकारच्या जीआरनुसार जिथे २५ टक्क्यांपेक्षा अधिक अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या असेल, तिथे कन्नड भाषेसह अल्पसंख्याक समाजाच्या भाषेची अट असायला हवी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, आता राज्य सरकारचा निर्णय हा कन्नड भाषिक उमेदवारांना बाजूला सारण्यासाठीच घेतला जात असल्याची टीका होऊ लागली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest