जुन्या राजेंद्रनगरमधील कोचिंग सेंटरच्या तळघरात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू ; सेंटरच्या समन्वयक, घरमालकासह चौघांना अटक

दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२७ जुलै) रात्री घडली होती. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 29 Jul 2024
  • 11:05 am
IAS Coaching, preparing for UPSC died, Delhi, three students died

संग्रहित छायाचित्र

तिघांचे बळी गेल्यावर सरकारला जाग

नवी दिल्ली: दिल्लीतील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२७ जुलै) रात्री घडली होती. या घटनेनंतर आता विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या कोचिंग सेंटरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी संबंधित कोचिंग सेंटरचे तळघर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आता या कोचिंग सेंटरच्या समन्वयकासह अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या तळघरात परवानगीशिवाय लायब्ररी स्थापन करण्यात आली होती, अशीदेखील माहिती आहे.

परवानगी नसतानाही या इमारतीच्या तळघरात लायब्ररी सुरू करण्यात आली होती. या ठिकाणी वर्गदेखील घेतले जात होते. या तळघराची परवानगी गोडाऊन म्हणून वापरण्यासाठी देण्यात आली होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करत या ठिकाणी बेकायदा वाचनालय सुरू करण्यात आले होते. या प्रकरणी आता कोचिंग सेंटरच्या समन्वयकासह इमारतीचा मालक, अन्य दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १०६ (१), १५२, २९० आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य दिल्लीचे उपायुक्त एम. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७ वाजता यंत्रणांना घटनेची माहिती मिळाली. दिल्लीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावरील पाणी सखल भागात साचले. जुन्या राजेंद्रनगरमधील राव यूपीएससी कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी भरल्याचे समोर आले. त्यात काही विद्यार्थी फसल्याचे लक्षात आले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या दलाने तातडीने धाव घेतली. या ठिकाणी १२ फूट पाणी साचले होते. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू ओढवला. इतक्या लवकर तळघर पाण्याने कसे भरले याचा तपास करण्यात येत आहे. या घटनेत तीन विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नेविन डाल्विन हा केरळचा विद्यार्थी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पीएचडी करत होता आणि सोबतच सनदी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते. तान्या विजय कुमार सोनी, श्रेया राजेंद्र यादव या दोन तरुणींचा यामध्ये मृत्यू ओढवला आहे.

विद्यार्थी रस्त्यांवर
या घटनेने सनदी अधिकारी होण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी रस्त्यावर धरणे आंदोलन केले, तर रविवारी विद्यार्थी मोठ्या संख्येने 'आप' सरकारचा निषेध करण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायदंडाधिकाऱ्यांकरवी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना या प्रकरणी २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या बाजूला राजेंद्रनगर भागात राहून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधला.  यावेळी विद्यार्थी म्हणाले, अद्याप कोणीही या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. सरकारमधील कोणीतरी येथे यावे आणि या दुर्घटनेत दगावलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घ्यावी, असे आम्हाला वाटते. ते (सरकार आणि प्रशासन) लोक त्यांच्या वातानुकूलित घर अथवा कार्यालयात बसून ट्वीट (एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील पोस्ट) करून किंवा पत्र लिहून विद्यार्थ्यांचं भविष्य सुधारू किंवा ठरवू शकत नाहीत.दरम्यान दिल्ली सरकारने या घटनेचे दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत.

राहुल गांधींनी काय म्हटले ?
दिल्लीतील एका इमारतीच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पावसात विजेचा धक्का लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. पायाभूत सुविधांचा हा ऱ्हास हे व्यवस्थेचे अपयश आहे. असुरक्षित बांधकाम, निकृष्ट नियोजन आणि संस्थांच्या बेशिस्तपणाची किंमत सर्वसामान्य नागरिक आपला जीव गमावून चुकवत आहेत. सुरक्षित आणि आरामदायी जीवन हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि सरकारची जबाबदारी आहे, असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

महिन्यापूर्वीच केली होती तक्रार
किशोर सिंह कुशवाह यांनी २६ जून रोजी याबाबत तक्रार नोंदवली होती. करोल बाग परिसरातील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात परवानगी नसताना वर्ग भरवले जात आहेत. संमती नसताना असे वर्ग भरवले जात असल्याने येथील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे, याकडे दिल्ली महापालिकेचे लक्ष वेधले होते. तसेच हे सेंटर चालवणाऱ्या संस्थेलाही आपण याची कल्पना दिली होती. मात्र त्यांनी त्यासाठी महापालिकेला पैसे दिले जात असून हे पैसे पालिका आयुक्तांना मिळत असल्याचे सांगितले होते. याशिवाय अशा धोकादायक इमारतीत कोचिंग क्लास घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंतीही कुशवाह यांनी केली असल्याचे सांगितले.

पुराने घेतला श्रेयाचा बळी
टीव्हीवरील बातम्यात आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचे समजल्याचे श्रेया यादव यांचे काका धर्मेंद्र यादव यांनी म्हटले आहे. धर्मेंद यादव रात्रीच उत्तर प्रदेशातून दिल्लीत पोहचले परंतु त्यांच्या लाडक्या भाचीचा मृतदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. दिल्लीच्या राव आयएएस स्टडी सेंटरमध्ये त्यांची भाची श्रेया यादव आयएएसची तयारी करीत होती. जुन्या राजेंद्रनगरमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावर हे कोचिंग सेंटर आहे. तिचे शव मिळालेले नसल्याने काका धर्मेंद्र यादव यांना ही बातमी खोटी ठरावी ही आशा होती. परंतु जेव्हा मृतांची यादी त्यांच्या हाती लागली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही मोठ्या आशेने श्रेयाला दिल्लीला पाठवले होते. ती नक्की आयएएस होणारच अशी आम्हाला आशा होती. कारण ती खूप हुशार होती, असे अश्रू ढाळत धर्मेंद्र यादव सांगत होते. आता क्लास सेंटरचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदार बांसुरी स्वराज यांची आपवर टीका
दरम्यान, दिल्लीतील भाजप खासदार बांसुरी स्वराज व दिल्ली मनपाच्या महापौर शेली ऑबेरॉय यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्याची पाहणी केली. त्यानंतर खासदार स्वराज यांनी या घटनेसाठी दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारला दोष दिला आहे. तसेच स्थानिक आमदार दुर्गेश पाठक यांच्याकडे स्थानिकांनी नालेसफाई करण्याची विनंती केली होती. मात्र नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील पाणी तळघरात शिरले, असा आरोपही स्थानिक भाजपा नेते करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest