मी राष्ट्रासह उभा आहे त्यांना माझी चूक वाटत असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे; प्राणप्रतिष्ठेला हजर राहिल्याबद्दल जिवे मारण्याच्या धमक्या
नवी दिल्ली : मला धमक्या देणारे काही फोन कॉल्स मी रेकॉर्ड केले आहेत. ज्यांचे देशावर प्रेम आहे ते माझ्यावर प्रेम करतील आणि मला साथ देतील. मी राम मंदिर सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे काही लोक माझा द्वेष करत असतील तर अशा लोकांनी पाकिस्तानात (pakistan) जावे, अशा शब्दांत ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (DR. IMAM UMER ILYAS) यांनी त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांना खडसावले आहे.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांच्या विरोधात फतवा काढण्यात आला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात डॉ. इलियासी सहभागी झाले होते. रविवारी (२८ जानेवारी) हा फतवा जारी करण्यात आल्याचे इमाम यांनी सांगितले. मात्र राम मंदिर कार्यक्रमापासून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये जिवे मारण्याची धमकी असून कुटुंबाविरोधात अपशब्दही वापरले जात आहेत. या धमक्या देणाऱ्यांना डॉ. इलियासी यांनी फटकारले आहे. मला धमक्या देणारे काही फोन कॉल्स मी रेकॉर्ड केले आहेत. ज्यांचे देशावर प्रेम आहे ते माझ्यावर प्रेम करतील आणि मला साथ देतील. मी राम मंदिर सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे काही लोक माझा द्वेष करत असतील तर अशा लोकांनी पाकिस्तानात जावे. मी प्रेम आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी माफी मागणार नाही आणि राजीनामाही देणार नाही. धमक्या देणाऱ्यांना हवे ते करू द्या, असे ते म्हणाले आहेत.
माणुसकी कुठल्याही धर्मापेक्षा मोठीच
माझ्या विरोधात तिरस्काराचे वातावरण तयार केले जात आहे. हुसैनी कास्मी नावाचे एक गृहस्थ आहेत. मी त्यांना ओळखत नाही पण त्यांचा फतवा आला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा किंवा परिणामांना सामोरे जावे. त्यांनी जे चार मुद्दे मांडलेत त्यातला एक मुद्दा हा आहे की तुम्ही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला का गेलात? तुम्ही मुख्य इमाम आहात तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. दुसरा मुद्दा हा उपस्थित केला की माणुसकी कुठल्याही धर्मापेक्षा मोठी आहे हे तुम्ही म्हणाला आहात हा तुमचा अपराध आहे, असेही या फतव्यात म्हटले आहे. तिसरा मुद्दा हा आहे की धर्मापेक्षा राष्ट्र मोठे आहे, असे मी म्हटलेले त्यांना आवडलेले नाही. मी त्यांना हे सांगू इच्छितो हा इस्लामिक देश नाही. हा भारत देश आहे, इथे विविधतेत एकता आहे. जर या लोकांना माझ्या प्रेमाच्या संदेशाबाबत काही त्रास असेल, मी राष्ट्रासह उभा आहे ही त्यांना माझी चूक वाटत असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानात जावे, असे इलियासी यांनी म्हटले आहे.