मग इतरांना संन्यास घ्यायला का प्रवृत्त करता; जग्गी वासुदेव यांना मद्रास उच्च न्यायालयाचा सवाल

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मद्रास उच्च न्यायालयाने एक प्रश्न विचारला आहे. वासुदेव यांनी स्वत:च्या मुलीचे लग्न करून दिले, मग दुसऱ्यांच्या मुलींना संन्यासी म्हणून राहण्यासाठी का प्रोत्साहित करत आहात, असा सवाल न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती व्ही. शिवगमन यांच्या खंडपीठाने विचारला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Wed, 2 Oct 2024
  • 06:28 pm

File Photo

निवृत्त प्रोफेसरने घेतली न्यायालयात धाव

मद्रास : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना मद्रास उच्च न्यायालयाने एक प्रश्न विचारला आहे. वासुदेव यांनी स्वत:च्या मुलीचे लग्न करून दिले, मग दुसऱ्यांच्या मुलींना संन्यासी म्हणून राहण्यासाठी का प्रोत्साहित करत आहात, असा सवाल न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती व्ही. शिवगमन यांच्या खंडपीठाने विचारला आहे.

एका निवृत्त प्रोफेसरने जग्गी वासुदेव यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्या व्यक्तीने स्वत:च्या मुलीचा विवाह लावून दिला आणि तिला आयुष्यात चांगल्या पद्धतीने स्थापित केले,  ती व्यक्ती दुसऱ्यांच्या मुलींना मुंडन करून संन्यासीचे जीवन जगण्यास का प्रोत्साहन देत आहेत? हे जाणून घ्यायचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

जग्गी वासुदेव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करणाऱ्या निवृत्त प्रोफेसरने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या दोन उच्चशिक्षित मुलींना ईशा योगा सेंटरमध्ये कायमचे राहण्यासाठी त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले.  कोईम्बतूरच्या तामिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीत शिकवणारे एस. कामराज यांनी उच्च न्यायालयात आपल्या मुलींची सुटका करण्याची विनंती केली आहे.

कामराज यांच्या एका मुलीचे वय ४२ तर एका मुलीचे वय ३९ वर्षे आहे. दोन्ही मुलींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.  यावेळी आपल्यावर कोणताही दबाव नसून स्वेच्छेने ईशा योगा केंद्रात राहात असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन मुलींनी आपल्या आयुष्याचा मार्ग निवडण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतला असेल तर त्याबाबत चिंता व्यक्त करण्याचे कारण नाही, असा युक्तिवाद ईशा फाऊंडेशनच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने आम्ही कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही पण प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे असे स्पष्ट केले. 

कामराज यांचे गंभीर आरोप

निवृत्त प्रोफेसर एस. कामराज यांनी ईशा योग केंद्रात आपल्या मुलींना असे जेवण आणि औषधे दिली जातात, ज्यामुळे त्यांची विचार करण्याची क्षमता कायमची गेली आहे, असा आरोप केला आहे. कामराज यांच्या मोठ्या मुलीने ब्रिटेनच्या युनिव्हर्सिटीतून एमटेक केले आहे. २००८ मध्ये घटस्फोटानंतर तिने योगा क्लासेस सुरू केले. त्यानंतर लहान बहिणीबरोबर ती कोईम्बतूरमधल्या ईशा योग केंद्रात आली. आता दोघीही तिथेच राहतात असे एस. कामराज यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest