संग्रहित छायाचित्र
गौतम अदाणी प्रकरणी (Gautam Adani) केल्या जाणाऱ्या गैरव्यवहाराबाबत आपण शरद पवारांना (Sharad Pawar) याबाबत कधीही प्रश्न केलेला नाही. शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार गौतम अदाणींना पाठिशी घालत नाहीत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) अदाणींना पाठिशी घालत आहेत. त्यामुळेच मी हा प्रश्न मोदींना विचारत आहे. जर पवार देशाचे पंतप्रधान असते आणि ते गौतम अदाणींना पाठिशी घालत असते, तर मी हा प्रश्न पवारांना केला असता, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी बुधवारी केले. गौतम अदाणी विषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी यांनी त्याला वरील शब्दात उत्तर देत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. अदाणी प्रकरण प्रकाशझोतात आल्यापासून पवार आणि अदाणी यांच्यात तीन-चार वेळा भेटी झाल्या आहेत. इंडिया आघाडी अदाणी यांना लक्ष्य करत असताना पवार यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदाणी यांच्यातील जवळकीच्या संबंधावरून सतत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच अदाणी समुहाने अल्पावधीत केलेल्या प्रगतीमागचे रहस्य स्पष्ट करण्याची मागणीही केली आहे. अदाणींनी आर्थिक घोटाळे केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सतत केला जात आहे. खुद्द राहुल गांधींनी थेट संसदेत अदाणींबाबत सरकारला प्रश्न केला होता. २० हजार कोटी रुपयांबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची चांगलीच चर्चा झाली होती.
यावेळी एका पत्रकाराने मोदींना जसे प्रश्न विचारता, तसेच अदाणींची वारंवार भेट घेणाऱ्या पवारांना असे प्रश्न का करत नाही? असा प्रश्न राहुल गांधींना विचारला. त्यावर राहुल यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत शरद पवारांची बाजू घेतली. ते म्हणाले की, मी पवारांना याबाबत कधीही प्रश्न केलेला नाही. शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार गौतम अदाणींना पाठिशी घालत नाहीत. पंतप्रधान मोदी अदाणींना पाठिशी घालत आहेत. त्यामुळेच मी हा प्रश्न मोदींना विचारत आहे. जर पवार देशाचे पंतप्रधान असते आणि ते अदाणींना पाठिशी घालत असते, तर मी हा प्रश्न शरद पवारांना केला असता. राहुल गांधींनी या विधानातून पवार-अदाणी भेटीवर आपला कोणताही आक्षेप नसल्याचंच अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचं बोललं जात आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदाणी यांचे एकत्र प्रवास करतानाचे फोटो थेट संसदेत दाखवून मोदींवर अदाणींना मदत करत असल्याचा, त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असताना पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी पुन्हा एकदा अदाणी प्रकरणावरून मोदींना लक्ष्य केलं आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर गौतम अदानी यांच्यावर कारवाई कराल का?,यावर राहुल गांधी म्हणाले, "आम्ही हे नक्की करून दाखवू. फक्त अदानी नाही तर जो कोणी ३२ हजार कोटींची चोरी करेल, त्याची चौकशी केली जाईल."
बुधवारच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर २० हजार कोटी नव्हे तर ३२ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गौतम अदाणींना पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी ब्रिटनमधील फायनान्शियल टाईम्समधील एका बातमीचा दाखला दिला आहे. गौतम अदाणी व कोळसा किमतीचं गूढ या मथळ्याखाली ही बातमी छापून आली असून त्यावरून राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल म्हणाले की, अदाणी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते. अशा प्रकारे अदाणींनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास ३२ हजार कोटी रुपये उकळले आहेत. आपल्याकडे विजेचे दर वाढत जातात. अदाणी किंमती वाढवतात, गरीबांच्या खिशांमधून ते पैसा काढत आहेत. या बातमीने कोणतंही सरकार कोसळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला वारंवार वाचवत आहेत, अशा माणसाकडून ही थेट चोरी होत आहे. आधी आम्ही २० हजार कोटींचा उल्लेख करून विचारले होतं की हा पैसा कुणाचा आहे? कुठून आला? आता कळतंय की २० हजार कोटी हा आकडा चुकीचा होता. त्यात आता १२ हजार कोटी आणखी वाढले आहेत. त्यामुळे आता हा आकडा ३२ हजार कोटी झाला आहे.