संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: देशात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. कोलकाता, बदलापूर येथील घटना ताजी असतांना आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीचा साखरपुडा झाला. ती होणाऱ्या नवऱ्यासोबत ऋषिकेश येथे फिरायला गेली असता, त्याने हॉटेलमध्ये तिच्यावर पाशवी बलात्कार केला.
तिला आठ ठिकाणी चावला व तिला गंभीर मारहाण केली. यानंतर त्याने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्याच्या मित्रांनीही तरुणीवर अत्याचार केला. अंशू चौधरी असे आरोपीचे नाव आहे. त्याने त्याच्या होणाऱ्या बायकोवर अत्याचार केले आहेत. आरोपीने होणाऱ्या पत्नीला ऋषिकेश फिरायला नेले. त्या ठिकाणी अंशू चौधरीने त्याच्या होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला. एवढेच नाही तर मित्रांनाही तिच्यावर अत्याचार करायला लावला. अंशू चौधरीसोबत इतर आरोपी आदित्य कपूर, यश उंजाल, मुस्ताफा या तिघांना देखील अटक करण्यात आली आहे.
अत्याचार झाल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध
गाझियाबादचे पोलीस उपायुक्त राकेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यामधून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोर्टासमोरही या तरुणीने तिच्यावर हॉटेलमध्ये होणाऱ्या पतीने बलात्कार केल्याची कबुली दिली असल्याचे कुमार यांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार २१ ऑगस्ट रोजी घडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दोघे एकत्रच गाझियाबादला परत निघाले. मात्र वाटेत आरोपीने त्याच्या तीन मित्रांना फोन करून बोलावून घेतले. या तिघांनीही या तरुणीचा छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने २४ ऑगस्ट रोजी तक्रार दिली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपींनी मुलीची छेड काढून तिला गाझियाबाद पेट्रोल पंपावर सोडून दिल्याचे तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आरोपींना अटक केली आहे.
नराधम आठ ठिकाणी चावला
पीडितेचा आरोपी अंशू चौधरीबरोबर साखरपुडा झाला होता. त्याने तिला एकत्र फिरायला जाऊ असे सांगत ऋषिकेशला आणले. दोघांनी हॉटेलमधील रूममध्ये प्रवेश केल्यानंतर अंशूने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिच्या अंगावर त्याने आठ ठिकाणी चावे घेतले. यामुळे तिला वेदना होत असतानाही नराधमाने तिचा छळ केला.