संग्रहित छायाचित्र
स्वयंघोषित बाबा आणि त्यांचे कारनामे याचे अनेक किस्से वारंवार समोर येत असतात. अशा घटनांमुळे अनेक सामान्य नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचेही प्रकार पोलीस तपासात उघड झाले आहेत. उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारे एका स्वयंघोषित बाबाने तब्बल १६ हजार ५०० फुटांवर बेकायदेशीररीत्या देवीचे मंदिर बांधले आहे. आपल्याला देवीने स्वप्नात येऊन त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे आदेश दिल्याचा दावा या बाबाने केला आहे. स्थानिक प्रशासनाला हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या संदर्भात चौकशी सुरू केली आहे.
उत्तराखंडमधील डोंगराळ भाग आणि त्यावर साचलेला बर्फ, तिथला निसर्गरम्य परिसर हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण असते, पण त्याचबरोबरीने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा भाग संवेदनशील असून इथले अनेक भाग इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून प्रशासनाने जाहीर केले आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही. असल्यास त्यासाठी सर्व संबंधित विभागांची पूर्वपरवानगी आवश्यक ठरते. पण उत्तराखंडच्या बागेश्वर भागातल्या सुंदरधंगा पर्वतराजीमधल्या एका पर्वतावर एका स्वयंघोषित बाबाने कुणाच्याही नकळत चक्क एक मंदिर बांधले आहे.
यासाठी त्याने केलेला दावाही अजब आहे. बाबा योगी चैतन्य आकाश असे या बाबाचे नाव असून आपल्याला थेट देवीनेच स्वप्नात येऊन या ठिकाणी मंदिर बांधण्याचे आदेश दिल्याचा दावा त्याने स्थानिक गावकऱ्यांसमोर केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून चक्क १६ हजार ५०० फूट उंचीवर असून तिथपर्यंत हा बाबा पोहोचला कसा? याचीही आपबीती इथले गावकरी सांगतात.
अनधिकृतपणे बांधले मंदिर
काही स्थानिकांना बाबाने नियम डावलून मनमानी पद्धतीने हे बांधकाम केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या संदर्भात माहिती द्यायला सुरुवात केली. बाबा योगी चैतन्य आकाश याने गावकऱ्यांना ठामपणे सांगितलं की, थेट देवी भगवती मातेनेच स्वप्नात येऊन आपल्याला हे मंदिर या ठिकाणी बांधण्याचे आदेश दिले. स्थानिक गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. गावकऱ्यांनीच मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य एवढ्या उंचीवर वाहून नेण्यात त्याला मदत केली. त्यांच्याच सहकार्याने बाबाने हे मंदिरही बांधले आणि त्यानंतर तिथे रीतसर पूजा-अर्चा करायला सुरुवात केली.
दरम्यान, बाबांनी या ठिकाणी असणाऱ्या पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल म्हणून वापर करायला सुरुवात केल्याचाही आरोप काही स्थानिकांनी केला आहे. स्थानिक भाविकांसाठी हे कुंड म्हणजे एक पवित्र स्थान असून दर १२ वर्षांनी इथे होणाऱ्या नंद राज यात्रेदरम्यान भाविक या कुंडात पवित्र स्नान करतात, पण अनेकदा बाबा त्या कुंडात आंघोळ करताना दिसतात, असा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या संदर्भात चौकशीला सुरुवात केली आहे. वनविभाग, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक लवकरच या ठिकाणी भेट देणार असून अनधिकृतरीत्या केलेले हे बांधकाम हटवले जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच, या स्वयंघोषित बाबावर योग्य ती कारवाईही केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.