संग्रहित छायाचित्र
गांधीनगर : सहा वर्षांची चिमुरडी शाळेच्या मुख्याध्यापकाचे बोट धरून रोज शाळेत जात असे. मुलीच्या पालकांचाही त्याच्यावर विश्वास होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजून २० मिनिटांनी मुलीच्या घरी आला. मुलीच्या आईने मोठ्या विश्वासाने चिमुरडीला त्याच्यासोबत शाळेत पाठवले. ती मुख्याध्यापकाच्या कारमध्ये बसली. पण, शाळेत पोहोचलीच नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने जेव्हा सत्य शोधले त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसला.
गुजरातमधल्या दाहोद जिल्ह्यात ६ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे धक्कादायक कारण उघड झाले आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्या या चिमुकलीची तिच्या शाळेतल्या मुख्याध्यापकानेच हत्या केली. मुख्याध्यापकाला दुष्कर्म करण्यास तिने प्रतिकार केला. त्यामुळे त्याने मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या परिसरात फेकला. मुलीच्या बूट आणि बॅगेचीदेखील विल्हेवाट लावली. पोलिसांनी या प्रकरणात ५५ वर्षांच्या गोविंद नट या मुख्याध्यापकाला अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजदीप सिंह झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ वर्षांच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी शाळेच्या परिसरात आढळला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टममधून मुलीची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी १० जणांची टीम नियुक्त केली होती. मुलीच्या आईने सांगितले की, ती रोज गोविंदबरोबरच शाळेत जात होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली होती. त्यावेळी आपण, तिला शाळेत सोडले आणि कामासाठी बाहेर गेलो. त्यानंतर मुलीसोबत काय झाले, हे माहिती नाही, अशी जबानी दिली होती. पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच मुख्याध्यापकाच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्याने गोविंदच्या फोन लोकेशनचे डिटेल्स मागवले. त्यानंतर त्यांचा संशय पक्का झाला. पोलिसांनी त्याची कठोरपणे चौकशी केली. त्यानंतर त्याने अखेर सर्व सत्य सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर एक दिवसांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आला. त्यामध्ये त्याचा मृत्यू गळा दाबून झाला, हे स्पष्ट झाले. मुलगी शाळा संपल्यानंतरही घरी परतली नाही. त्यावेळी तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी ती शाळेच्या परिसरात इमारतीच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आढळली. मुलीला लिमखेडा सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.