अमरोहाचे आमदार व समाजवादी पक्षाचे नेते महबूब अली
लखनौ : मुसलमानांची लोकसंख्या आता वाढत आहे. त्यामुळे आम्ही लवकरच देशातील हिंदूंचे शासन संपवणार असल्याचे सांगत अमरोहाचे आमदार व समाजवादी पक्षाचे नेते महबूब अली यांनी खुलेआम धमकी दिली आहे. त्यांच्या या विधानावरून नव्या वादाला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे तर अली यांच्या समाजवादी पक्षाने त्यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे.
समाजवादी पक्षाने आयोजित केलेल्या संविधान सन्मान बैठकीत ते बोलत होते. या बैठकीतून महबूब अली यांनी हे विधान केले आहे. मुघलांनी या देशावर ८०० वर्षे राज्य केले, त्यांची सत्ता संपुष्टात आली, तुमचीही संपणार. २०२७ ला भाजप सत्तेवरून दूर होणार, अशी टीका करतानाच अली यांनी एकदम हिंदूंवर टीका करायला सुरुवात केली. लवकरच तुमचे राज्य संपुष्टात येणार आहे. मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. आता आम्ही सत्तेत येणार आणि तुम्हाला संपवणार आहोत.
दरम्यान या वक्तव्यानंतर भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी खासदार व उत्तर प्रदेश भाजपचे सरचिटणीस सुब्रत पाठक म्हणाले, समाजवादी पक्षाच्या नेत्याने केलेल्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. अखिलेश यादवांनी या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. अखिलेश यादव यासाठीच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का? एकाच समुदायाच्या इच्छा पूर्ण होवोत यासाठीच सगळे काही चालले आहे का?
अखिलेश यादव यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की देशातील जनता आता सुज्ञ झाली आहे. देश आता बदलला आहे. हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले आहे. योगी आदित्यनाथ यांना दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केले आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही इंडिया आघाडी आणि समाजवादी पक्षाचे धोरण संशयास्पद आहे. त्यांना हिंदूंना संपवायचे आहे, ही त्यांची भूमिका अखिलेश यादवांना मान्य आहे का, अशी टीका केली आहे. दरम्यान अली यांच्या विधानाशी पक्ष सहमत नसल्याचे सांगत समाजवादी पक्षाचे नेते सुनील साजन यांनी सारवासारव केली आहे. ते अली यांचे व्यक्तिगत विचार असल्याचेही साजन म्हणाले आहेत.