राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल आणि दरबार हॉल या दोन महत्त्वाच्या हॉल्सची नावे बदलली

नवी दिल्ली: देशात काही शहरांची, रस्त्यांची नावे बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाशी आहे अशा अनेक बाबतीत टीका-टिप्पणीही केली जाते

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 26 Jul 2024
  • 03:52 pm
Rashtrapati Bhavan, Ashok Hall, Ashok Mandap, Darbar Hall, Gantantra Mandap

संग्रहित छायाचित्र

अशोक हॉल बनला अशोक मंडप, दरबार हॉल नव्हे गणतंत्र मंडप!

नवी दिल्ली: देशात काही शहरांची, रस्त्यांची नावे बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाशी आहे अशा अनेक बाबतीत टीका-टिप्पणीही केली जाते. मात्र, आता थेट राष्ट्रपती भवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉलची नावे बदलण्यात आली आहेत. खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच या संदर्भातली घोषणा केली आहे.  

दरबार हॉल आणि अशोक हॉल हे राष्ट्रपती भवनातल्या काही महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉल आहेत. यातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदानासारखे अनेक महत्त्वाचे सोहळे पार पडतात. तर दुसरीकडे अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात. या दोन्ही हॉलची नावे बदलण्यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले असून त्यात या संदर्भात प्रयत्न केले जात होते, असे नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनातील वातावरण हे भारतीय संस्कृती, मूल्ये आणि तत्त्वांचं प्रतिबिंब असावं, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

काय आहेत बदललेली नावे ?

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामकरण आता ‘गणतंत्र मंडप’ असे करण्यात आले आहे. तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘दरबार हा शब्द प्रामुख्याने भारतीय शासक व ब्रिटिशांच्या न्यायनिवाड्याच्या जागेशी संबंधित आहे. पण भारत प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात गणतंत्र झाल्यापासून हा शब्द गैरलागू झाला आहे. गणतंत्र पद्धती ही भारतीय समाजव्यवस्थेमध्ये अगदी प्राचीन काळापासून रुजलेली आहे’, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जायचा. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. त्याशिवाय, सम्राट अशोकाच्या नावानेही हे नाव जोडले जाते. त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचे स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडले जाते. ‘अशोक हॉलचे नामकरण अशोक मंडप असे केल्यामुळे भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येते आणि अशोक शब्दाशी निगडित मूलभूत तत्त्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest